नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान नागपूरच्या हिंगणा मतदारसंघातील एका कॉलेजमध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे, याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सांगत आहे की, स्थानिक कॉलेजमध्ये बाहेरून आलेले आणि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांना ग्रुपमध्ये पाठविण्यात येत असून त्यांच्याकडून बोगस मतदान करवून घेण्यात येत आहे. यावर व्हिडीओमधील व्यक्तीने आक्षेप घेतला असून संताप व्यक्त केला. आज कॉलेजला सुट्टी असतानाही विद्यार्थांना कॉलेजच्या नावावर आत पाठवून बोगस मतदान करवून घेत असल्याचे व्हिडिओमधील व्यक्तीने म्हटले. हा प्रकार धक्कादायक असून निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
धंतोलीतील खाजगी रुणालयाच्या कर्मचाऱ्यांनाही वानाडोंगरी येथील एका शाळेत मतदान करण्यास पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कर्मचाऱ्यांना आपली नावे वानाडोंगरी येथील मतदार यादीत नमूद असल्याचे माहिती देखील नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान नागपूर शहराच्या तुलनेत नागपूर ग्रामीणमध्ये मतदारांमध्ये अधिक उत्साह बघायला मिळाला. उमरेडमध्ये सर्वाधिक २३ टक्के मतदान पार पडले. नागपूर ग्रामीणच्या सावनेर, रामटेक आणि कामठी मतदारसंघात प्रत्येकी २० टक्के मतदान झाले. नागपूर ग्रामीणमध्ये सर्वात कमी मतदान हिंगणा मतदारसंघात झाले आहे. हिंगणामध्ये केवळ १७ टक्के मतदारांनी आपल्या अधिकाराचा वापर केला.