-दक्षिण-पश्चिम व पश्चिम नागपूर
वयोश्री व दिव्यांग सहायता योजना
-ज्येष्ठ दिव्यांगासाठी विरंगुळा केंद्र
-साहित्य वितरणाचे चवथे शिबिर
नागपूर: पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा या जिल्ह्यात मोठ्या संख्येत सिकलसेल व थॅलेसेमियाचे रुग्ण आहेत. या रुग्णांवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. या शस्त्रक्रियेसाठी नागपुरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्यंत कमी खर्चात व्यवस्था करण्यात येणार असल्याचे माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. तसेच राष्ट्रीय वयोश्री व दिव्यांग योजनेतून एकही गरजू वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचेही ते म्हणाले.
दक्षिण-पश्चिम व पश्चिम नागपुरातील वृध्द व दिव्यांगांना आज नि:शुल्क उपकरणांचे वितरण रामदासपेठेतील काचीपुरा चौक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ वसतिगृहाच्या मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे, आ. परिणय फुके, माजी आ. सुधाकर देशमुख, नाना श्यामकुळे, प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, प्रा. संजय भेंडे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी डॉ. इटनकर, नासुप्र सभापती मनोज सूर्यवंशी व बाल्या बोरकर उपस्थित होते.
नागपूर शहर व जिल्ह्यातील 40 हजार ज्येष्ठ व दिव्यांगाना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- ज्येष्ठ व दिव्यांगांची सेवा करण्याची ही संधी या योजनेच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठांची एक संघटना आम्ही सुरु केली असून ज्येष्ठ नागरिकांना विविध ठिकाणी नि:शुल्क पर्यटनासाठी 2 बसची सुविधा उपलब्ध केली. दिव्यांगांसाठी दिव्यांग पार्क नागपुरात उभारला जात आहे. या पार्कमध्ये जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा दिव्यांगांना देण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ दिव्यांगासाठी एक विरंगुळा केंद्रही लवकरच सुरु करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून उच्च दर्जाची साहित्य व उपकरणे देण्यात येत आहेत, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.
पूर्व नागपुरातील 6 जिल्ह्यांमध्ये सिकलसेल व थॅलेसेमिया या रोगाचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. ही संख्या अजूनही वाढत असून यावर उपचार आणि औषधी अत्यंत महाग आहे. सर्वसामान्य एवढे महाग उपचार व औषध घेऊ शकत नाही. या रोगावर उपचार व औषधे कमी खर्चात उपलब्ध होतील, यासाठीही आमचे प्रयत्न आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.
ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे वैभव : ना. फडणवीस
समाजातील ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे वैभव आहेत. त्या पिढीने अनेक कष्ठ सोसत नवीन पिढी घडविली, अशा ज्येष्ठांना चांगले व आनंदी जीवन मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ज्येष्ठ व दिव्यांगांचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना सुरु केल्या. वयोश्री योजनेचाही त्यात समावेश आहे. या योजनेत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करून त्यांना विविध साहित्य व उपकरणांचा नि:शुल्क लाभ दिला जात आहे. नागपुरात ना. गडकरी यांनी स्वत: लक्ष घालून ही योजना यशस्वी केली आहे. या योजनेतील साहित्य उच्च दर्जाचे आहेत. या योजनेपासून एकही दिव्यांग व ज्येष्ठ वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही ना. फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमात माजी नगरसेवक बाल्या बोरकर यांचा या शिबिराचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.