नागपूर: नागपूर महानगरपालिका, नागपूर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार (ता. २) पासून सिव्हील लाईन्स येथील राणी कोठी येथे मुलींची सबज्यूनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ सप्टेंबरपर्यंत रंगणा-या या स्पर्धेचे उद्या रविवारी दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. विशेष अतिथी म्हणून राज्याचे उर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, डॉ. मिलींद माने, गिरीश व्यास, अनिल सोले, नागो गाणार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मनपा सत्तापक्ष नेता संदीप जोशी, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, बसपा गटनेता मोहम्मद जमाल, शिवसेना गटनेता किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेस गट नेता दुनेश्वर पेठे, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचवि जय कवळी, स्पर्धा निरीक्षक सी.बी. राजे, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव भरत व्हावळ, धरमपेठ झोन सभापती प्रमोद करौती, नगरसेविका प्रगती पाटील, शिल्पा धोटे, नगरसेवक कमलेश चौधरी आदी उपस्थित राहतील, अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक व आयोजन समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, क्रीडा समिती नागेश सहारे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, नागपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सज्जड हुसैन, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रेम चंद, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव भरत व्हावळ, विभागीय सचिव व बॉक्सिंग प्रशिक्षक गणेश पुरोहित, नागपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव अरुण बुटे, आयोजन समितीचे सचिव राकेश तिवारी, सर्बिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशाला रौप्य पदक मिळवून देणारी शहरातील आंतरराष्ट्रीय बॉक्सर अल्फीया पठाण आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. दयाशंकर तिवारी म्हणाले, देशात पहिल्यांदाच सबज्यूनिअर मुलींची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. मेरी कॉम नंतर आज मोठ्या प्रमाणात मुली बॉक्सिंगकडे वळत आहेत व विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करून नाव लौकीक करीत आहेत. ही श्रृंखला कायम राहावी व देशातील अनेक प्रतिभावंत बॉक्सरने पुढे येउन २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये देशाची पदक संख्या वाढावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. नागपूर शहरात बॉक्सिंगची सुरूवात करणारे काका परांजपे यांचे नाव स्पर्धा परिसराला देण्यात येणार आहे.
स्पर्धेमध्ये देशातील विविध ३१ राज्यांतील सुमारे ४०० खेळाडू सहभागी होणार आहेत. सर्बिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशाला रौप्य पदक मिळवून देत जगात नागपूरचे नाव लौकीक करणारी आंतरराष्ट्रीय बॉक्सर अल्फीया पठाणसह हंगेरीमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकाविणारी अकोला येथील बॉक्सर साक्षी गायधने या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे, असेही श्री. दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
खेळाडूंची व्यवस्था आमदार निवासात
देशभरातून स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या सर्व खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था सिव्हील लाईन्स येथील आमदार निवास येथे करण्यात आली आहे. स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी म्हणून बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव जय कोवळी, भारतीय बॉक्सिंग संघाचे माजी व्यवस्थापक के.के. बोरो, अर्जुन पुरस्कार विजेते डी.एफ.आय.चे मुख्य निवडकर्ता कॅप्टन गोपाल देवांग, अर्जुन पुरस्कार विजेते एस. जयराम, मनोज पिंगळे, राजेंद्रप्रसाद, भारतीय महिला बॉक्सिंग संघाच्या मुख्य प्रशिक्षक अमनप्रीत कौर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आय. व्यंकटेश्वर राव आदी जबाबदारी सांभाळतील.