नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपुरात भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमध्ये मुस्लीमांविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याने राणे अडचणीत सापडले. ‘मशिदीत घुसून मारु’ असा भारतीय मुस्लीम बांधवांना दम दिला होता. उलट राज्यातील पोलिस माझे काही वाकडे करु शकत नाही, अशा अविर्भावात राणे होते. याविरोधात नागपुरात विविध कलमाखाली राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहम्मद युनूस मोहम्मद युसूफ पटेल (४७) रा. प्लॉट नं. ५४, उत्कर्ष जी. एन. सोसायटी, पोलिस लाईन टाकळी, अवस्थीनगर, असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे मेहराजुन्न नबी कमीटी, पश्चिम नागपूरचे अध्यक्ष असून सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतात. राणे यांनी मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला.
मशिदीत घुसून मुस्लीमांना मारु-
नितेश राणे हे भाजपचे जेष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र आहेत.तसेच ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनकवली विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार आहेत. रविवारी त्यांनी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ शिवाजी चौक, श्रीरामपूर, अहमदनगर येथे आयोजीत भर सभेत आपल्या भाषणात मुस्लीम समाजाला दम दिला.मशिदीत घुसून मुस्लीमांना मारु असे म्हटले होते. हा साधा दम नसून चक्क धमकी होती.
अशा द्वेषपूर्ण वक्तव्याने भारतीय नागरिकांत दरी निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. केवळ शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेचे दुर्लक्ष करण्यासाठी नितेश राणे यांनी केलेला हा केवीलवाना खटाटोप असलयाचे विरोधकांनी म्हटले आहे. याप्रकरणी आ. राणे यांच्याविरुद्ध यापूर्वी अहमदनगर व श्रीरामपूरमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. तर आता नागपुरातही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.