नागपूर : महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदावर ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांची निवड थेट भरती प्रक्रियेने झाली असून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे नुकतीच प्रकाशगड मुख्यालयात स्वीकारली. संचालक (मानव संसाधन) पद हे नव्याने निर्माण करण्यात आले असून या महत्वाच्या पदावर ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च विद्याविभूषित गंजू यांना मानव संसाधन क्षेत्राचा दीर्घ अनुभव आहे.
जम्मू काश्मीर येथील मूळचे असलेले ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांची सेनादलात ३८ वर्षे सेवा झाली असून त्यांनी विविध महत्वाच्या पदावर काम केले आहे. भारतभर विविध ठिकाणी सेनादलाच्या सेवाकाळात त्यांनी महत्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे.
ब्रिगेडियर पवन कुमार गंजू हे विज्ञान शाखेतील पदवीधर असून त्यांनी व्यवस्थापन, पत्रकारिता, कर्मचारी व्यवस्थापन व औद्योगिक संबंध, मार्केटींग, फूड ॲनालायसीस इत्यादी विषयात विविध विद्यापीठातून पदव्युत्तर पदव्या संपादन केल्या आहेत.
याशिवाय त्यांनी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी अनेक महत्वपूर्ण विषयाचे प्रशिक्षण घेतले असून त्यांनी सेनाप्रशासनात मानव संसाधन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. महावितरणच्या मानव संसाधन विभागात अधिक सकारात्मक बदल करण्याचा मानस ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांनी व्यक्त केला आहे.