नागपूर : जातीच्या प्रमाणपत्रासह इतर कोणतेही काम करायचे असेल तर दलालांकडून शॉर्टकट शोधला जातो. यावर कायमस्वरूपी प्रतिबंध बसावा आणि शॉर्टकट बंद व्हावेत यासाठी महसूल विभागात फिफो (फर्स्ट इन फर्स्ट आउट) ही प्रणाली वापरायला सुरुवात झाली. तरीही ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढून दलाल त्यांची फसवणूक करीत आहेत. एका दलालाने तर अस्तित्वात असलेल्या एका आपले सरकार सेवा केंद्राचे नाव वापरून बनावट पावती तयार करीत ग्राहकांना लुटण्याचा व्यवसाय सुरू केला असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
जातीचे प्रमाणपत्र, डोमिसाइल, उत्पन्न प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, नॉन क्रिमिलेअर, रहिवासी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र अशा एकूण १५ प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी आता फिफो प्रणाली वापरायला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने प्रणाली अपलोड केली आहे. प्रथम येणाऱ्याचाच अर्ज आधी निकाली काढण्यात येतो nagpur.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले सरकार सेवा केंद्राची माहिती घेऊ शकता. नागरिकांनी दलालाकडे जाण्याची गरज नाही. बनावट प्रमाणपत्र काढत असाल तर विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यात त्यांना अनेक अडचणी जातात, त्यामुळे आता जागरूक व्हा, असे आवाहन महाआयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक उमेश घुगुसकर यांनी नागरिकांना केले.
डोमिसाइलसाठी दोन हजारांची मागणी
विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी दलालांची टोळी आजही सक्रिय असल्याच्या तक्रारी ‘मटा’कडे प्राप्त झाल्या. या तक्रारीचा आधार घेत ‘मटा’ने या रॅकेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी शासकीय दर ३४ रुपये असताना एका दलालाने दोन हजार रुपयांची मागणी केली. एका नागरिकाने ती देण्याची तयारी दर्शविली. पैसे दिल्यानंतर दलालाने प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू केली. यासाठी त्या दलालाने सचिन स्वरूपानंद लुनावत या अधिकृत आपले सरकार सेवा केंद्राचे नाव वापरले आणि चक्क बोगस पावती तयार केली. ७ एप्रिल २०२३ रोजी तयार झालेल्या या पावतीवर २२५०५४०३२१२५३४००७३६९८ असा टोकन क्रमांक आहे. चार महिन्यांपेक्षा अधिक अवधी होऊनही दलालाने प्रमाणपत्र दिलेच नाही. ‘ही पावती आमच्या केंद्रात तयारच झाली नाही’, असे पारडी येथील अधिकृत केंद्र चालक सचिन लुनावत यांनी सांगितले. दलालांवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली.
पावतीचा पंचनामा
-तयार करण्यात आलेल्या बनावट पावतीवरील शब्दांचे फॉन्ट वेगवेगळे आहेत.
-अर्जदाराचे नाव आणि इमारतीचे नाव चौकटीच्या बाहेर येत आहे
-दलालाने ही पावती आपल्या कम्प्युटरवरच तयार केल्याचे दिसून येते
-आपले सरकार सेवा केंद्राच्या नावाने असलेल्या आधीची पावती एडिट करून ही बोगस पावती तयार करण्यात आली आहे
शुल्कावर एक नजर…
-जातीचे प्रमाणपत्र : ५६ रुपये (स्कॅनिंगचे पैसे अतिरिक्त)
-प्रतिज्ञापत्र : ३४ रुपये (स्कॅनिंगचे पैसे अतिरिक्त)
-नॉन क्रिमिलेअर : ५६ रुपये (स्कॅनिंगचे पैसे अतिरिक्त)
-वय अधिवास : ३४ रुपये (स्कॅनिंगचे पैसे अतिरिक्त)
किती दिवसांत मिळणार?
-वय अधिवास : १५ दिवस
-जातीचे : ४५ दिवस
-उत्पन्न : १५ दिवस
-नॉन क्रिमिलेअर : २१ दिवस
-रहिवासी : ७
-ज्येष्ठ नागरिक : ७
-अल्पभूधारक : १५