‘नॉर्थ कॅनल’ नामकरणासाठी केला होता पाठपुरावा
नागपूर : गेल्या कित्येक वर्षांपासून नागपुरातील एका नाल्याला चंबार नाला असे संबोधण्यात येत होते. मात्र, हे जातीवाचक नाव असून ते बदलविण्यात यावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या प्रभाग क्र. ६ चे नगरसेवक तथा बसपाचे मनपातील पक्ष नेते जितेंद्र घोडेस्वार यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता या नाल्याला नॉर्थ कॅनल असे संबोधण्यात येणार आहे.
यासंदर्भात बसपा पक्ष नेते जितेंद्र घोडेस्वार यांनी वेळोवेळी मनपा सभागृहात प्रश्न उपस्थित करून हा विषय पुढे नेला. अखेर मनपाच्या ३१ मे च्या सर्वसाधारण सभेत महापौर दयाशंकर तिवारी यांनी यासंदर्भात निर्णय घेत नाल्याचे नाव आणि पत्त्यातही बदल करण्यात आला. आता यापुढे या नाल्याला ‘नॉर्थ कॅनल’ असे संबोधण्यात येणार आहे.
बसपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार यांच्या प्रयत्नामुळे झालेल्या नावबदलाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. रविवारी (ता. २५) जयभीम चौक यादव नगर येथे जयभीम चौक विकास समितीच्या वतीने जितेंद्र घोडेस्वार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जयभीम चौक विकास समितीचे अध्यक्ष धर्मपाल वंजारी, उपाध्यक्ष प्रसन्नजीत गजभिये, सचिव बुद्धीवान सुखदेव, नितीन सोमकुंवर, मयूर मेश्राम, संजय नागदेव, सिद्धार्थ ठवरे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
उद्धघोस फाऊंडेशनच्या वतीनेही श्री. जितेंद्र घोडेस्वार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजकुमार मेश्राम, अशोक नगरारे, सुरेश पाटील, विलास सोमकुंवर, योगेश लांजेवार, इंद्रपाल वाघमारे, दीपक वासे, शिशुपाल कोल्हटकर, बुद्धीवान सुखदेव, उमेश बोरकर, अविनाश धमगाये, राजन वाघमारे, श्री. महाजन, संजय फुलझेले, श्री. शेंडे उपस्थित होते.