नागपूर : जातीवाचक स्थळांची नावे बदलण्यासाठी पुढाकार घेतलेल्या आणि ते करून दाखविणारे मनपातील बसपाचे पक्षनेते तथा नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला संघटनेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
ज्या स्थळांना जातीवाचक नावे आहेत, ते बदलण्यासाठी अनेक संघटनांनी प्रशासनाला निवेदने दिलेत. प्रभाग ६ चे नगरसेवक तथा बसपाचे पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार यांनी नागपूर महानगरपालिकेच्या सभेत वेळोवेळी मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे उत्तर नागपुरातील एका नाल्याचे नाव बदलून आता ‘नॉर्थ कॅनॉल’ असे ठेवण्यात आले. मनपाच्या सर्वसाधारण सभेत महापौर दयाशंकर तिवारी यांनी ई-मेल, पोस्टल ॲड्रेससहीत नाव बदलाचे आदेश दिले. नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले.
यानिमित्त विविध समाजसंघटनांकडून श्री. घोडेस्वार यांचा सत्कार करण्यात येत आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघ संतशिरोमणी रविदास समाज भवन महिला संघटना नागपूरच्या विदर्भ अध्यक्ष मीना भगवतकर, प्रा. नानेश्वर बसेशंकर यांच्या संघटनेच्या वतीनेही निवेदने देण्यात आली होती. आता नाव बदल झाल्यामुळे हिनेंद्र इंगळे, अशू राजूरकर, रवी पेलणे, लिलाध गौरखेडा, शशिकांत राजूरकर, राजेंद्र इंगळे आदींनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व नागपूरकरांच्या वतीने त्यांच आभार मानले.