Published On : Fri, Mar 10th, 2023
By Nagpur Today Nagpur News

विदर्भाला संजीवनी देणारा अर्थसंकल्प : संदीप जोशी

Advertisement

कृषी, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, उद्योग असा सर्वांगिणदृष्ट्या विदर्भाला नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला असल्याची प्रतिक्रीया भाजपा नेते नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित अर्थसंकल्पातून विदर्भाच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे. संत्रानगरी अशी ओळख असलेल्या नागपूर आणि विदर्भात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र, नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र होणे ही येथील शेतक-यांसाठी सर्वात मोठी भेट आहे. शेतीतून कष्टाने उत्पन्न घेणा-या शेतक-यांना १ रुपयात पीक विमा योजनेमुळे खूप मोठा आधार देण्याचे कार्य सरकारद्वारे करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदतीचा महत्वाचा पुढाकार वित्तमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. विदर्भासह मराठवाड्यातील १४ आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदतीचा निर्णय घेतला असून प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी १८०० रुपये देण्याची सरकारची संकल्पना ही बळीराजासाठी सन्मानजनक ठरणार आहे, असा विश्वास संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

Gold Rate
19 April 2025
Gold 24 KT 95,800 /-
Gold 22 KT 89,100 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, नागपूर शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती या विदर्भातील शिक्षण संस्थांना ५०० कोटी रुपये विशेष अनुदान तसेच लक्ष्मीनारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देउन विशेष अनुदान यासोबतच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असलेल्या अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला देखील अभिमत क्रीडा विद्यापीठाचा दर्जा देउन विदर्भातील शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी महत्वाचे पाउल सरकारने उचलले आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाला १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने भविष्यात नागपुरातून अनेक खेळाडू राज्य आणि देशाला जागतिक पातळीवर पदकांची कमाई करून देतील, असा विश्वासही संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना वित्त मंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दीनिमित्त १० कोटी रुपये निधीची उपलब्धता करून देत येथील साहित्य संस्कृतीसाठी मोठा पुढाकार घेतला. नागपुरात संत जगनाडे महाराजांच्या कला दालनासाठी पुढाकार घेत ८ कोटी रुपये निधीची तरतूदही करण्यात आली आहे. याशिवाय उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने देशाचे मध्यबिंदू असलेल्या नागपूर शहरासाठी मोठी पर्वणी निर्माण होत आहे. शहराचे सुपूत्र वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरात १ हजार एकर जागेत लॉजिस्टिक हबच्या निर्मितीसाठी महत्वाचा पुढाकार घेतला आहे.

यामुळे विदर्भातील युवशक्तीला लॉजिस्टिक पार्क, खनिकर्म क्षेत्रात सक्षम कुशल रोजगार मिळणार आहेत. याशिवाय वित्त मंत्र्यांनी मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी निधीची तरतूदही केली आहे. नागपूर विमानतळाचा विस्तार, मेट्रोच्या दुस-या टप्प्यातील ४३.८० किमी लांबीच्या प्रकल्पाचे ६७०८ कोटी रुपयांचे काम, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, असे अनेक प्रकल्प नागपूर शहराला आणि विदर्भाला विकासाच्या नव्या उंचीवर घेउन जाणार असल्याचेही माजी महापौर संदीप जोशी म्हणाले.

वित्त मंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात नमूद केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातून वाहणाऱ्या नद्यांना मोठा लाभ होणार आहे. नागपूर आणि विदर्भात व्यसनमुक्तीच्या दृष्टीने महत्वाचे पाउल सरकारद्वारे उचलण्यात आले आहे. नागपुरात नवीन व्यसनमुक्ती केंद्र प्रस्थापित करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्यात १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे होणार असल्याने राज्यातील गोरगरीब जनतेला मोठा लाभ मिळेल, असाही विश्वास संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

Advertisement
Advertisement