नागपूर : शहरातील हिंगणा येथे वाय.सी.सी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रितीका रामचंद्र निनावे (वय 21) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स या शाखेच्या चौथ्या वर्षात शिकत होती.
माहितीनुसार, रितीका सोमवारी महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा सोहळा आटोपून तिच्या मित्राच्या दुचाकीवरुन वानडोंगरी परिसरातून घरी जात होती. यावेळी सरोदी मोहल्ला येथे मागून भरधाव वेगात आलेल्या एका टिप्परने रितीकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे रितीकाचा तोल जाऊन ती खाली पडली. नेमक्या याचवेळी ट्रकचे मागचे चाक रितीकाच्या अंगावरुन गेले. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.