नागपूर : विनाअनुदानीत आयुर्वेद महाविद्यालयाच्या आंतरवासीय विद्यार्थ्यांपासून ५ हजार इतके इंटर्नशिप प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येत आहे. यामुळे त्या द्यार्थ्यांवर आर्थिक संकटाचा भर पडत असून प्रशिक्षण शुल्क त्वरित माफ करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, या मागणीचे पत्र राज्यपाल, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, संचालक, आयुष संचालनालय यांना लिहिले आहे.
आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांचा आंतरवासीयता प्रशिक्षण कालावधी १ वर्षाचा असून ३ महिने ग्रामीण रुग्णालय येथे प्रशिक्षणासाठी जिल्हा शल्यचिकित्सका द्वारा २,५०० रुपये व ३ महीने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रशिक्षणासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्या द्वारा २,५०० रुपये आकारण्यात येत आहे. यावर विद्यार्थांनी संताप व्यक्त केला. विनाअनुदानीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा अतिरिक्त शुल्का का ? प्रशिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळणे अपेक्षित असतांना मात्र शुल्काच्या स्वरूपात आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान राज्यात एकूण ८४ आयुर्वेद महाविद्यालये असून त्यापैकी ४९ विनाअनुदानीत महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आंतरवासीयता विद्यावेतन शासना तर्फे देण्यात येत नाही. मात्र शासकीय व अनुदानीत आंतरवासीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्रतिपूर्ती म्हणून प्रती माह ११,००० इतके विद्यावेतन देण्यात येते त्यासह कुठलाही आंतरवासीय प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येत नाही.
आयुर्वेदिक शिक्षणाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंटर्नशिप प्रशिक्षण कालावधी जो एक वर्षाचा असतो आणि विद्यार्थ्यांना अनमोल वैद्यकीय अनुभवाने सुसज्ज करतो. तथापि, सध्याची फी रचनेमुळे विद्यार्थ्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे, असे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) च्या स्टुडंट फोरमचे नागपूर विभागीय सचिव डॉ. शुभम बोबडे म्हणाले. तर आम्ही राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राज्य आयुष संचालक यांना पत्र लिहून फी रचनेवर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे, डॉ ठवकर म्हणाले. निमा स्टुडंट फोरम नागपूर शाखेच्या सचिव डॉ प्राजक्ता इंगोले यांनी असा दावा केला की या विसंगतीमुळे विनाअनुदानित महाविद्यालयांमधील आयुर्वेद इंटर्नच्या खांद्यावर अनावश्यक आर्थिक भार पडला आहे.