नागपूर: नागपूरमध्ये लग्नासाठी चाललेल्या वऱ्हाडी बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. नागपूर भंडारा रोडवर लग्नाची वरात घेऊन चाललेली बस उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली. या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. तर 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.
आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत शिंगोरी गावाजवळ ही घटना घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड भंडारावरून नागपूरला परतत होते. यावेळी रोडवर उभ्या असलेल्या कंटेनरला बसची जोरात धडक बसली. यामध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 5 ते 6 जण जखमी झाले आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इतर 5 ते 6 लोकं जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात इतका भीषण होता की समोरच्या बाजूने बसचा संपूर्ण चुरा झाला आहे. हा अपघात घडताच स्थानिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांनी माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. तर दोन मृतदेह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अद्याप मृतांची ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.