राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ एप्रिलपासून घर खरेदी महागणार आहे. घर खरेदी करताना १ टक्का मेट्रो सेस भरावा लागणार आहे. शहर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी याबद्दलची माहिती दिली. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपुरातील घरं यामुळे महागणार आहेत.
मुंबईत घर खरेदी करताना १ एप्रिलपासून ६ टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. सध्या घर खरेदी करताना ५ टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागत आहे. तर पुणे, ठाणे आणि नागपुरात १ एप्रिलपासून ७ टक्के ड्युटी भरावी लागेल. १ टक्के मेट्रो उपकरातून मिळणारा महसूल मेट्रो, पूल, उड्डाणपूल यासारख्या वाहतुकीशी संबंधित प्रकल्पांसाठी वापरण्यात येईल. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे.
नव्या उपकराची आकारणी करण्यासाठी, नवा उपकर लागू करण्यासाठी सरकारच्या आदेशाची वाट पाहत असल्याचं मालमत्ती नोंदणी अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यानं मेट्रो उपकर लावण्यात येणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं. यामुळे मेट्रो शहरांमधील घराचं स्वप्न आणखी महागणार आहे.