Published On : Tue, Mar 19th, 2019

सी- व्हिजिल ॲप’ नागरिकांसाठी ठरतेय प्रभावी अस्त्र

26 नागरिकांनी केला ॲपचा वापर

नागपूर: निवडणुकीदरम्यान आदर्श आचार संहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची नागरिकांना तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजिल ॲप’च्या माध्यमातून सुविधा प्रथमच उपलब्ध करुन दिली आहे. या माध्यमातून नागरिकही स्वतंत्र व नि:पक्षपाती निवडणुकांच्या संचलनासाठी सक्रियपणे जबाबदार भूमिका बजावू शकतात. नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील 26 नागरिकांना ‘सी-व्हिजिल ॲप’चा वापर करुन आचार संहितेच्या उल्लंघनाबाबतच्या तक्रारी प्रथमच दाखल केल्या आहेत.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भारत निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी ‘सी-व्हिजिल ॲप’ जनतेसाठी उपलब्ध करुन दिले असून नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेले बॅनर व फ्लेक्स असल्याबाबत सी-व्हिजिल ॲप वरुन तक्रारी केल्या आहेत. यापैकी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सादर झालेल्या सर्व तक्रारींची तात्काळ दखल घेतली. यापैकी 13 ठिकाणी असलेले बॅनर तात्काळ हटविले आहे. तसेच 10 तक्रारींची प्रत्यक्ष पडताळणी केली असता त्याजागेवर आचार संहितेचा भंग होत नसल्याचे आढळून आले. दोन तक्रारी चौकशी स्तरावर आहेत. तर एक तक्रार निर्णय प्रक्रियेत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

रामटेक लोकसभा मतदार संघात सी-व्हिजिल ॲप या मोबाईलच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन कामठी येथील व रामटेक येथील पाच तक्रारींचा समावेश आहे. नागपूर मतदार संघातील नागपूर-दक्षिणमध्ये दोन, नागपूर दक्षिण-पश्चिममधील 11, नागपूर- पूर्वमधील तीन तर नागपूर उत्तरमधील एका तक्रारीचा समावेश आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीसंदर्भात सरासरी 2 ते 29 मिनिटांच्याआत दखल घेवून कारवाई करण्यात आली आहे.

‘सी-व्हिजिल या ॲप’मार्फत नागरिकांना आदर्श आचार संहिता भंग होत आहे असे वाटत असल्यास नागरिकांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा आणि भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह ॲपवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. त्यानंतर तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशाप्रकारे आचार संहितेसंदर्भातील घटना नोंदवू शकतात.

नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होते. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ही तक्रार पाठविण्यात येते. त्यानंतर जीव्हीआयजी, आयएल अन्वेषक या जीआयएस आधारित मोबाईल ॲप्लिकेशनच्या साहाय्याने संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या 15 मिनिटांच्याआत पोहचणे अपेक्षित आहे. संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास व तक्रारींच्या तथ्यांची तपासणी करुन या संबंधीचा अहवाल या ॲपद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठविल्या जातो. हा अहवाल 30 मिनिटांपेक्षा कमी कालावधीत पोहचणे आवश्यक आहे. या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येते आणि तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100‍ मिनिटांच्याआत तक्रारींची स्थिती तक्रारदार नागरिकांना पाठविण्यात येईल. तक्रार करणाऱ्या नागरिकांना मोबाईलवर सुद्धा संदेशाद्वारे कळविण्यात येईल.

नागरिकांनी आचार संहिता भंग होत असलेल्या तक्रारीसंदर्भात ‘सी-व्हिजिल ॲप’चा वापर करावा तसेच तक्रार नोंदवायची असल्यास राज्य संपर्क क्रमांक 1950 यावर सुद्धा कॉल करता येईल. ‘सी-व्हिजिल मार्फत मतदारांना पैसा, मद्य आणि अंमली पदार्थांचे वाटप मतदारांना मारहाण अथवा दमबाजीचा प्रकार, जमावाला चिथावणीखोर भाषण तसेच मतदारांना आमिष आदीबाबत तक्रार करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आवाहन केले आहे.

Advertisement