नागपूर – नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) यांच्या अहवालातून भाजपच्या नेतृत्वाखालील असलेल्या मोदी सरकारने आपल्या योजनांमध्ये ‘गैरव्यवहार’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारच्या योजनांमधील एकूण ७ घोटाळे काँग्रेसने उचलून धरले असून यासंदर्भात काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विट करत माहिती दिली. कॅगने आपल्या अहवालात मोदी सरकारच्या तथाकथित गैरव्यवहारांसंदर्भात खुलासा केला आहे. मात्र यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याचे श्रीनेत यांचे म्हणणे आहे.या घोटाळ्यासंदर्भात मोदींनी स्पष्टीकरण द्यावे. तसेच यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
‘कॅग’च्या अहवातून हे सात घोटाळे उघड :
भारतमाला प्रकल्प –
या प्रकल्पांतर्गत रस्ते बांधणीसाठी करण्यात आलेल्या खर्चामध्ये मोठी फेरफार झाल्याचे समोर आले आहे. यासाठी झालेला खर्च प्रतिकिलोमीटर १५.३७ कोटी रुपये असताना तो ३२ कोटी रुपये दाखविण्यात आला. इतकेच नाही तर निविदा प्रक्रियेतही त्रुटी झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकल्पासंदर्भाचा अहवाल कधीही सादर करण्यात आलेला नाही . ३,५०० कोटी रुपये परस्पर दुसरीकडे वळविण्यात आले. प्रकल्पासाठी सुरक्षा सल्लागाराचीही नेमणूकही करण्यात आली नव्हती. मोदी सरकारने या या प्रकल्पांसाठी जनतेची दिशाभूल केली.
द्वारका द्रुतगती महामार्ग : रस्ते बांधणीसाठीचा खर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटी रुपये असताना तो २५० कोटी रुपये इतका करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारताच्या प्रथम श्रेणी-विभाजीत शहरी द्रुतगती मार्ग, द्वारका द्रुतगती मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग- 248बीबी) प्रगतीचा आढावा घेतला होता. भारतमाला प्रकल्पांतर्गत आणि 8,662 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा हा आहे. हा भारतातील पहिला उन्नत शहरी द्रुतगती मार्ग असेल आणि यामुळे दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषण कमी करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल, असे गडकरी म्हणाले होते. मात्र कॉगच्या अहवालात रस्ते बांधणीसाठीचा खर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटी रुपये असताना तो २५० कोटी रुपये इतका करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर अली आहे.
आयुष्मान भारत योजना : मोदी सरकारने या योजनेमध्ये एकाच मोबाईल क्रमांकाअंतर्गत ७.५ लाख लाभार्थींची नोंद, उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या ८८ हजार रुग्णांच्या नावे निधीचे वाटप करण्यात आले.
NHAI टोल संकलन :
पाच टोल नाक्यांचे ऑडिट केले तेव्हा राष्ट्रीय महामार्ग महामंडळाने जनतेचे १३२ कोटी रुपये लुटल्याची बाब समोर आली आहे. देशातील प्रत्येक टोल नाक्याचे ऑडिट केल्यास प्रचंड लूट झाल्याचे लक्षात येईल.
अयोध्या विकास प्रकल्प :
या प्रकल्पाची जमीन कवडीमोलाने खरेदी करून राम मंदिर ट्रस्टला प्रचंड दराने विकण्यात आली. या प्रकल्पाचे कंत्राटदार नसलेल्यांच्या खात्यांवर पैसे जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे.
ग्रामीण विकास मंत्रालय :
ग्रामीण विकास मंत्रालयाने पेन्शन योजनेचा पैसा मोदी सरकारच्या प्रचारात खर्च केल्याचे समोर आले आहे.
एचएएल : HAL वर विमान इंजिनच्या डिझाईन-उत्पादनात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप, 154 कोटींचे नुकसान केल्याबद्दलही कॅगच्या अहवालातून टीका करण्यात आली आहे.
दरम्यान कॅगच्या या अहवालानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. याच मुद्द्यावरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे.
कॅगच्या अहवालामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक खात्याच्या एका प्रकल्पाची किंमत तब्बल १४ पटींहून जास्त वाढल्याचा प्रकार समोर आल्याने यात मोठा भ्रष्टचार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच आता नितीन गडकरी यांच्या अडचणीतही मोठी वाढ झाली असून यासंदर्भात कॅग अर्थात भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.