नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन
नागपूर: न्यौछावर थे जिनके प्राण-त्राण बस माँ भारती पर, कर गए वो वर्षा ‘अमृत’ की, बिछोह का विष पीकर ।।
संपूर्ण देशात हे वर्ष ‘स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने स्वातंत्र्याच्या यज्ञात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी मैत्री परिवार संस्थेच्यावतीने काढण्यात आलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
याप्रसंगी मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पेंडके, चंदूजी पेंडके, रोहित हिमते, समीर वझलवार, दिलीप ठाकरे, दत्ता शिर्के, मंजुषा जोशी, हेमंत नायडू व दिपांशु खिरवडकर यांची उपस्थिती होती.
मैत्री परिवार संस्थेने नवीन वर्ष २०२२ चे स्वागत करण्याकरिता एक अद्वितीय असे कॅलेंडर तयार केले असून त्यात शूरवीर आणि विरांगनांची त्यांच्या जन्मतारखेनुसार विभागणी करण्यात आली आहे. त्यांनी देशासाठी केलेले बलिदान कायम स्मरणात राहावे आणि त्यांना त्या त्या महिन्यात श्रद्धांजली अर्पण करता यावी, हा त्यामागील उद्देश आहे. तरुण पिढीला त्यांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून देण्यासाठी हे कॅलेंडर एक महत्त्वाचे पाऊल सिद्ध होईल, अशी आशा आहे.
नितीन गडकरी यांनी कॅलेंडरच्या संकल्पनेचे कौतूक करतानाच त्याच्या निर्मितीत महत्वपूर्ण योगदान देणा-या चंदूजी पेंडके, स्क्वेअर मीडियाच्या मंजुषा जोशी, डिझाइन मार्टचे हेमंत नायडू व शब्दरचना करणारे दीपांशू खिरवडकर यांचे अभिनंदन केले.