नागपूर: शहरातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाई मे अखेरपर्यंत पूर्ण करा. दुसऱ्या टप्प्यातील काम त्यानंतर तातडीने सुरू करा, असे निर्देश मनपाचे आरोग्य सभापती मनोज चापले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात मनपाच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपसभापती विजय चुटेले, सदस्य दिनेश यादव, वंदना चांदेकर, विशाखा बांते, आरोग्य अधिकारी (मे.) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, श्री. लुंगे उपस्थित होते.
प्रारंभी आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी नालेसफाईबाबत विस्तृत माहिती दिली. नागपूर शहरात लहान-मोठे २३६ नाले आहेत. १७३ नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे तर ६३ नाल्यांची सफाई जेसीबद्वारे करावी लागते. त्यापैकी ९९ नालेसफाईचे मनुष्यबळाद्वारे कार्य प्रगतीपथावर आहे. काहींचे जेसीबीने कार्य सुरू आहे. दोन्ही टप्प्यांतील नालेसफाई १५ जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती डॉ. दासरवार यांनी दिली. यावेळी सभापती मनोज चापले यांनी नालेसफाईचा झोननिहाय आढावा घेतला. मनुष्यबळाद्वारे आणि जेसीबीने स्वच्छ करण्यात येत असलेल्या नाल्यांची आकडेवारी झोनल अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितली. शक्य तितक्या लवकर कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळामुळे नाल्यांमध्ये पुन्हा कचरा गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. असे असले तरी पहिल्या टप्प्यातील सफाईचे संपूर्ण काम ३१ मे पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी दिला.
स्वच्छता सर्वेक्षणात यावर्षी सर्वच सहायक आयुक्त आणि झोनल अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदा स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरचा अव्वल क्रमांक लागेल, असा विश्वास डॉ. प्रदीप दासरवार यांनी व्यक्त केला. पुढील वर्षीच्या दृष्टीनेही कार्याला सुरुवात झाली आहे. झोन क्र. एक मध्ये कचरा विलगीकरणाच्या दृष्टीने १० परिसर निवडण्यात आले असून ‘पथदर्शी प्रकल्प’ येथे राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. अनिल चिव्हाणे यांनी मनपाच्या दवाखान्यांमधील कार्याची माहिती दिली. अन्य काही विषयांवरही बैठकीत चर्चा झाली.
बैठकीला दहाही झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.