नागपूर :राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुकलं असून येत्या २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पाडणार आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात यंदा कोणाची हवा असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.नागपुरातील सहाही मतदारसंघातील उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात ‘नागपूर टुडे’शी संवाद साधत आपले मत मांडले.
नागपूरच्या दक्षिण-पश्चिममधून फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडधे लढत-
नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्ष सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात उतरले आहेत.तर काँग्रेसने त्यांच्या विरोधात प्रफुल्ल गुडधे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. 2014 मध्ये मोदी लाट होती शिवाय भजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. स्थानिकांनी या भावनेने त्यांना भरभरून मते दिली. त्यानंतर 2019 मध्ये पक्षाने मला निवडणूक लढण्याची संधी दिली होती. पण माझ्याकडे पैसे नसल्याने मी तिकीट घेतले नाही. त्यामुळे फडणवीस पुन्हा निवडून आले. मात्र आता सत्तेची समीकरणे बदलली आहे. जनतेला आता परिवर्तन हवे आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे प्रफुल्ल गुडधे म्हणाले. तर भाजप नेते देवेंद्र फडणीस यांनीही जनता नक्कीच माझ्या पाठीशी असून आपल्याला बहुमताने निवडून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
मध्य नागपुरात प्रवीण दटके विरुद्ध बंटी शेळके सामना-
मध्य नागपुरातील जनता नक्कीच भाजपचा आमदार निवडून आणणार असल्याचा विश्वास भाजप नेते प्रवीण दटके यांनी व्यक्त केला. आमदार म्हणून निवडणूक आल्याचा मध्य नागपुरातील प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार आहे. याठिकाणी रोजगार निर्मितीवर माझा भर असेल, असे दटके म्हणाले.तर विधानसभा प्रचाराला सुरुवात झाली असून काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी जिंकण्याचा मोठा दावा केला आहे. भाजपने जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप शेळके यांनी केला.
उत्तर नागपुरात काँग्रेचे राऊत विरुद्ध भाजपचे माने यांच्यात लढत-
उत्तर नागपूरचे विद्यमान आमदार नितीन राऊत यांच्या विरोधात जनतेच्या मनात रोष आहे. येथील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित असून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यावर माझा भर राहील असे माने म्हणाले. स्थानिक जनता विकासाच्या नावावर मला नक्कीच निवडून देणार असा विश्वासही माने यांनी व्यक्त केला.
तर राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचारात जोर देऊन भाजपने मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला. भाजप नेत्यांनी ‘बटेेंगे तो कटेंगे’ हा नारा दिला.भाजपच्या नाऱ्याला काँग्रेसचे उत्तर नागपूरचे उमेदवार नितीन राऊत यांनी ‘जुडेेंगे तो जितेंगे’ने प्रत्युत्तर दिले आहे.मला माझ्या कामावर खूप विश्वास आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत उत्तर नागपूर मतरदारसंघातून मी बहुमताने निवडून आलो. यंदाही जनता मला निवडून देणार असल्याचे राऊत म्हणाले.
पूर्व नागपुरात भाजपचे खोपडे विरुद्ध राष्ट्रवादीच्या पेठे यांच्यात लढत-
जनता नक्कीच मला बहुमताने निवडून देणार असा विश्वास भाजप उमेदवार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केला. पूर्व नागपूरला विकासाचे मॉडेल म्हणून पहिल्या जाते. या भागात झालेल्या विकासामुळे येथील स्थानिक जनतेत आनंदाचे वातावरण आहे. येत्या काळात मतदारसंघाची कायापालट करणार असून येथील युवकांना रोजगार मिळवून देणार असल्याचे खोपडे म्हणाले.
पूर्व नागपुरात आतापर्यंत जे काही काम झाले ते अनियोजितरित्या झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांनी केली. याठिकाणी अदानी आंबानी च्या कंपनीला फायदा पोहोचविण्याचे काम झाले. गेल्या १५ वर्षांपासून रेंगाळत असलेल्या पडलेले डम्पिंग यार्डचे काम अद्यापही झाले नाही. तर त्यामळे डम्पिंग यार्डचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे पेठे म्हणाले. जनता नक्कीच मला जिंकून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दक्षिण नागपुरात कांग्रेसचे पांडव विरुध्द भाजपाचे मते यांच्या लढत-
मी महाविकास आघाडीचा उमेदवार असून दक्षिण नागपूर मतदारसंघात मला जनतेचा मोठा पाठिंबा आहे. यंदाच्या निवडणुकीत माझा वीज निश्चित असून मी 40 ते 50 हजार मतांची लीड घेणार असल्याचे काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव म्हणाले.
तर दक्षिण नागपूर मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार देण्याची प्रयत्न करणार असल्याचे भाजप उमेदवार मोहन मते म्हणाले. यंदाही जनता मलाच निवडून आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पश्चिम नागपुरात काँग्रेसचे विकास ठाकरे विरुद्ध भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात रणसंग्राम –
मी नगरसेवक, महापौर ते आमदार असा प्रवास केला असून, नागरिकांशी सतत संपर्कात असतो. माझ्या मतदारसंघात विद्यमान आमदार म्हणून मी आतापर्यंत जे काही काम केले त्यावर जनताही खुश आहे. भावी काळातही माझ्या मतदारसंघातील जनतेला मूलभूत सुविधा देण्यासाठी मी काम करेल,असे विकास ठाकरे म्हणाले.
तर पश्चिम नागपूर मतदारसंघातील जनतेशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. या मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपचा आमदार निवडून येणे गरजेचे आहे. जनता नक्कीच मोठ्या मताधिक्याने मला निवडून देईल, असा विश्वास कोहळे यांनी व्यक्त केला.