नवी दिल्ली -केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी खासदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, भारतात रस्ते अपघातात वाढ झाली आहे. त्यांनी कबूल केले की पदभार स्वीकारताना त्यांनी रस्ते अपघात 50% कमी करण्याचे आश्वासन दिले होते, तरीही रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
रस्ते सुरक्षेवरील चर्चेदरम्यान लोकसभेला संबोधित करताना गडकरी म्हणाले, अपघातांच्या संख्येत झालेली घट विसरून जा, त्यात वाढ झाली आहे हे मान्य करण्यात मला अजिबात संकोच नाही. जेव्हा मी रस्ता सुरक्षेवरील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होतो तेव्हा मी माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो,असेही गडकरी म्हणाले.
अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना –
अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री आज लोकसभेत म्हणाले.गडकरी म्हणाले की, NITI आयोग आणि AIIMS च्या अहवालानुसार अपघातात जखमी झालेल्यांपैकी 30 टक्के लोकांचा मृत्यू आपत्कालीन वेळी उपचारास उशीर झाल्यामुळे होतो. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून कॅशलेस उपचार योजना सुरू करण्यात येत आहे.
गडकरी म्हणाले की, आतापर्यंत जिथे जिथे अशा घटना घडल्या आहेत तिथे कॅशलेस उपचार योजनेअंतर्गत 2100 लोकांचे प्राण वाचले आहेत.आतापर्यंत सरकारला केवळ 1 लाख 25 रुपयेच द्यावे लागले आहेत.
येत्या तीन वर्षांत ही योजना संपूर्ण देशात सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री म्हणाले. कॅशलेस योजनेद्वारे पीडितांना तात्काळ पैसे दिले जातील, त्यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. या योजनेमुळे रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीने मिळू शकणार असल्याचे गडकरी म्हणाले.