नागपूर : शहरात गोवंश तस्करांची घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरून बोलेरो कारला अडविले असता यात नऊ गायी डांबलेल्या आढळल्या. पण पाहणासाठी गाडीत चढलेल्या पोलिसाला घेऊन गोवंश तस्करांनी कारवाईच्या भीतीने पळ काढला. हिमेश राठोड असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर नियंत्रण कक्षाच्या मदतीने तस्करांना ताब्यात घेऊन पोलिसाची सुटका करण्यात आली. गार्ड लाइनपासून तर ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत हा प्रकार सुरु होता.
पोलिसांनी गोवंश तस्करांकडून सात लाख रुपये किमतीचा महिंद्रा बोलेरो पिकअप ट्रक (MH-49/D-6659) जप्त केला आणि 2.90 लाख रुपये किमतीच्या नऊ गायींची सुटका केली. मोहम्मद सलीम मोहम्मद अन्वर (४१, रा. हंसापुरी खदान) आणि राजा मोहम्मद इस्माईल कुरेशी (३०, रा. हबीब नगर, टेका) अशी आरोपींची नावे आहेत.
मंगळवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने गार्ड लाइन येथील रेल्वे कार्यालयाजवळ बोलेरो पिकअप व्हॅन अडविली. वाहनाच्या झडतीदरम्यान पोलिसांना नऊ गायी दोरीने बांधलेल्या आढळल्या. कॉन्स्टेबल हितेश ठाकूर यांनी आरोपी दोघांना वाहन पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले असता आरोपी मोहम्मद सलीम आणि राजा मोहम्मद यांनी पोलिसाला धूळ चारत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
तस्करांचा हा डाव समजताच पोलिस कर्मचारी राठोड यांनी वॉकीटॉकी वरून नियंत्रण कक्षाला सूचना दिली. पोलिसांनी नाकाबंदी राबवून कपिलनगर ठाण्याअंतर्गत ऑटोमोटिव्ह चौकात बोलेरो अडविली. पोलिस कर्मचारी राठोड यांची सुटका करून चालकास ताब्यात घेतले.
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 363,279, मोटार वाहन कायद्याच्या कलम 184, 175, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम 5(अ), 5(ब), 9, 9(अ) नुसार गुन्हा नोंदवला.आरोपी मोहम्मद सलीम आणि राजा मोहम्मद यांच्या विरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे कलम 11(1)(e), 11(1)(f) नुसार पुढील तपास सुरू आहे.