नागपूर: आपल्यावर गोळीबार करून जीवघेणा हल्ला चढविणारे हल्लेखोर ३१ जानेवारीपर्यंत सापडले नाही तर या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीआयडीकडे सोपविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असे मत महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी ‘नागपूर टूडेलाङ्क फोनवरून दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. घटनेतील हल्लेखोर अद्यापही सापडल्या न गेल्याने आपले कुटुंबीय अद्यापही धास्तावले असल्याचेही त्यांनी सांगितले.
जोशी यांच्यावर १७ डिसेंबर, २०१९च्या मध्यरात्री बाईकवरून आलेल्या दोन हेल्मेटधारी अज्ञात हल्लेखोरांनी देशी कट्ट्यातून गोळीबार केला होता. यामध्ये जोशी थोडक्यात बचावले. हल्लेखोर ३ गोळ्या झाडून पसार झाले होते. ऐन हिवाळी अधिवेशन काळात महापौरांवर हल्ला झाल्याने संपूर्ण पोलिस प्रशासन आणि राजकीय पुढारीही खडबडून जागे झाले होते. मुलाखतीत जोशी पुढे म्हणाले, नागपूर पोलिस अद्यापही हल्लेखोरांचा शोध घेत आहे. दोन वरिष्ठ पोलिस अधिकारी माझ्या सतत संपर्कात आहेत. मला निनावी पत्र पाठवून धमकाविणाèया दोन संशयित युवकांचे स्केचही प्रकाशित करण्यात आले आहेत. नागपूर पोलिस प्रशासनाच्या तपासावर आपला पूर्ण विश्वास आहे. ते लवकरच हल्लेखोरांना बेड्या ठोकतील. यासाठी त्यांना वेळ द्यावा लागेल, असा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला आहे.
हल्लेखोरांचा शोध सुरूच – पोलिस आयुक्त
— ‘नागपूर टुडे’ प्रतिनिधीने शहर पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संदीप जोशी यांच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना आम्ही रात्रंदिवस शोध घेत आहोत. नागपूर गुन्हेशाखा प्रकरणाशी संबंधित छोटी-छोटी गोपनीय माहिती मिळताच त्या बाजुनेसुद्धा तपास करत आहोत. प्रकरणाशी जुळलेल्या काही संशयितांची कसून विचारपूस सुरू आहे. घटनेतील पुरावेही तपासल्या जात आहेत. या आधारे गुन्हेगाराचा लवकरच छडा लावू, असा विश्वास पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला.
काय घडले होते ‘त्या रात्री’?
— १७ डिसेंबर, २०१९ रोजी महापौर संदीप जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने त्यांनी अमरावती आउटर रिंग रोडवरील रसरंजन ढाब्यावर एक कौटुंबिक पार्टीचे आयोजन केले होते. ते पार्टी आटोपून मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घराकडे परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर देशी कट्ट्यातून ३ गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी जोशी हे स्वतः कार चालवित होते. या गोळ्या कारच्या काचा भेदून आरपार निघून गेल्या. नशीब बलवत्तर होते म्हणून, जोशी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. घटनेनंतर काही मिनिटातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागपूर शहरात नाकाबंदी केली. येथूनच हल्लेखोराचा शोध सुरू झाला. मात्र, घटनेला २६ दिवस उलटूनही हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही.
‘ते’ निनावी पत्र कोणाचे?
— संदीप जोशी यांनी महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नागपूर शहराला विकसित करण्यासाठी नागरिकांकडून सूचना आणि तक्रारी मागविल्या होत्या. यासाठी शहरात ठिकठिकाणी बॉक्स लावण्यात आले होते. यापैकी एका बॉक्समधून संदीप जोशी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र आले होते. यानंतर जोशी यांनी याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, महापौरांना जीवे मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र त्यांना कुणी पाठविले, याचाही शोध पोलिसांना लागत नाही, यामुळे कायदा आणि सुव्यवस्था संकटात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
– रविकांत कांबळे