रायगड: “छत्रपती शिवाजी महाराज ही आपली ओळख आहे. त्यांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी. महाराजांची जयंती केवळ उत्सव नव्हे तर सण आहे. जर आपण सण तिथीप्रमाणे साजरे करतो, तर महाराजांची जयंती तारखेप्रमाणे का? ती तिथीप्रमाणेच साजरी व्हावी, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते रायगडमध्ये बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, राज्याभिषेक हे उत्सव तिथी आणि तारखेनुसार दोन दोन वेळा होत असतात. याबाबत रायगड जिल्ह्यातील शिवप्रेमींनी महाड येथे राज ठाकरे यांची भेट घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आमंत्रण दिले.
यावेळी बोलताना, राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, राज्याभिषेक हे तिथीप्रमाणे साजरे व्हावेत असं मत व्यक्त केलं.
राज ठाकरे म्हणाले, “बऱ्याच वर्षांपूर्वी मी ‘कालनिर्णयकार’ जयंत साळगावकरांना भेटलो होतो. त्यावेळी मी त्यांना याबाबत प्रश्न विचारला होता. ते म्हणाले होते शिवाजी महाराजांची जयंती केवळ उत्सव नव्हे तर तो आपला सण आहे.
आपण दिवाळी, गणपती किंवा अन्य कोणतेही सण हे तारखेनुसार साजरे करतो का? मग शिवाजी महाराज है दैवत आहे, त्यांची जयंतीही तिथीनुसार व्हावी. खरं तर त्यांची जयंती आपण 365 दिवस साजरी करावी. महाराजांची जयंती हा आपला सण आहे”.
महाराजांचे हे उत्सव सण म्हणूनच साजरे करायला हवेत अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
मात्र त्याचवेळी राज ठाकरे यांनी पुतळे उभारण्यापेक्षा महाराजांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राची खरी दौलत आहे. त्यांचं संवर्धन करायला हवं, असं नमूद केलं.