नागपूर – केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह अजितदादा (Ajit Pawar) गटाकडे दिल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला. आमदार आणि खासदारांचे संख्याबळ तसेच बहुमताच्या जोरावर हा निर्णय अजितदादा गटाच्या बाजूने लागला. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात भाष्य केले.
शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह गेले, परंतु शरद पवार आहे तिथेच आहे. वरचढ कोण असेल यात मी जात नाही. पण आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू होत नाही तोपर्यंत वर्चस्व कोणाचे होईल सांगता येत नाही. निवडणूक आयोगाचा निकाल राष्ट्रवादी पुरता मर्यादित आहे. त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही.
वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची जी बैठक झाली. त्यात भाजपा सरकारची कोंडी करण्याचा आमचा हेतू आहे. जर आम्ही त्यात यशस्वी झालो तर पुढचा कार्यक्रम काय याबाबत चर्चा आणि महत्त्वाचा मसुदा आघाडीसोबत झालेल्या बैठकीत सादर केल्याचे आंबेडकर म्हणाले.
राजकीय परिस्थितीत जर तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची ऑफर आली तर तुम्ही स्वीकारणार का असा प्रश्न पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना केला. त्यावर मला बऱ्याचदा पदांची ऑफर आली आणि मी ती नाकारली.मला मोकळेपणाने जगणे आवडते, असेही आंबेडकर म्हणाले.
गेल्या पाच वर्षांपासून आपण ईव्हीएमच्या विरोधात कोर्टात लढत असून आता अनेक जण याचा विरोध करत असल्याचेही आंबेडकर म्हणाले. ईव्हीएमच्या संदर्भात कोर्ट आणि निवडणूक आयोग दोन्हीकडे दबाव टाकायला हवा. ईव्हीएममधून निघणाऱ्या VVPAT ची मोजणी व्हायला हवी,असेही आंबेडकर म्हणाले.