मुंबई – “नीतिमत्ता आणि राजकारण (Politics) या दोन्ही वेगळया गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर श्री. गडकरी (Nitin Gadkari) यांनी नेमके बोट ठेवले आहे. श्री. नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्के अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पाया भक्कम आहे.
समाजकारणासाठी गटारी राजकारण सोडण्याची प्रेरणा त्यांना नागपुरातूनच मिळत असावी. गडकरी बोलतात म्हणून निदान झाडा-पानांत थोडी तरी सळसळ होते, नाहीतर लोकशाहीचे सर्वच वृक्ष सध्या वठलेले दिसतात. गडकरींचा किल्ला अभेद्य राहावा ही लोकशाहीची गरज आहे!
सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत राष्ट्राच्या आकांक्षा जशा महाकाव्यात प्रकट व्हाव्यात तसे नाथ पैंच्या वक्तृत्वातून आमच्या सर्वांचे पडसाद उमटतात असे एकदा कवी वसंत बापट म्हणाले होते. अलीकडे नितीन गडकरी यांच्या अनेक वक्तव्यांतून लोकभावनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. गडकरी यांचे नागपूरचे भाषण सगळयांनाच विचार करायला लावणारे आहे. सध्या ‘राजकारण’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आली आहे.
महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे राजकारण कधी सोडतो असे वाटायला लागले आहे,” अशी निरवानिरवीची भाषा श्री. गडकरी यांनी करावी हे वेदनादायी आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरतआहेत.