नागपूर : शहरात मध्य भारतामधील सर्वात मोठ्या कर्करोग रुग्णालयाची स्थापना होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे २७ एप्रिलला उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
आपल्या देशात कर्करोग रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या अनुषंगाने डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्था (ट्रस्ट)च्या नियामक मंडळाने कर्करोग निदान, प्रतिबंध आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. यामध्ये रुग्णांना उपचारांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. कर्करोगाला हरवायचे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ही संस्था स्थापन करण्यात आली.
नागपूरच्या नॅशनल कॅन्सर रुग्णालयात एकूण 25 एकरात सोयी सुव्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. 470 बेड्सचे क्वाटरनरी केअर ऑन्कोलॉजी सेंटर म्हणून प्रस्तावित आहे. त्यामध्ये 9.5 लाख चौरस फूट एवढा बिल्ट-अप परिसरात आहे. अंदाजे भविष्यात 700 बेड वाढवता येणार असून रुग्णालयाची इमारत अंदाजे 10 मजली आहे.