नागपूर :- देशात लोकशाही राहिले की नाही असा प्रश्न देशातील सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे. ज्या हुकूमशाही पद्धतीने आज केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय द्वेष डोळ्यासमोर ठेऊन विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातो हे देशासाठी घातक आहे.
अशी टीका मोदी आडनावाच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने आज दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधीच्या समर्थनार्थ माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजप केंद्र सरकारवर केली आहे.
सध्या देशात बेरोजगारीने उच्चांक गाठले आहेत, महागाई वाढलेली आहे आणि अर्थव्यवस्था अत्यंत बिकट स्थितीत आहे. मात्र केंद्र सरकार देशातील सामान्य लोकांशी निगडित असलेल्या कोणत्याही विषयाला हात न घालता केवळ राहुल गांधी यांना लक्ष करीत असल्याचा आरोपही डॉ. राऊत यांनी केला.
सगळ्यांना माहिती आहे की राहुल गांधी हुकुमशाहीच्या विरोधात आवाज बुलंद करत आहेत. चूक गोष्टींना चूक म्हणण्याचं साहस त्यांच्यात आहे. केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असून राहुल गांधी केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधात सातत्याने आवाज उठवत असल्याने त्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार घाबरली आहे.
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) चौकशीसाठी विरोधकांच्या मागण्या रोखण्यासाठी लोकसभेत राहुलजींचा माइक बंद केले जात असून सत्ताधारी भाजप राहुल गांधींना संसदेत बोलू देत नाही. राहुल गांधी म्हणतात की “मी सत्यावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी सत्यासाठी लढतो आहे. मी भाजप, आरएसएसला घाबरत नाही आणि याचीच भीती देशातील केंद्र सरकार वाटते.
2019 मध्ये गुजरात मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या भाष्यावर कोर्ट निर्णय देत असेल तर जे राहुल गांधी म्हणतात ते खरंच होत असल्याचे दिसून येत आहे. राहुल गांधी यांना नाहक त्रास देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोलिसांची धडक दिली जात आहे.
जर मोदी नाव घेणे चूकीचे आहे तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंबंधी धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका का केली?
यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव घेत संसदेत टीका का केली होती? असे अनेक प्रश्न देशातील नागरिकांना पडला आहे.
जो कुणी या हुकुमशाहीविरोधात उभं राहू पाहतोय. त्याला अटक केली जातेय. त्यांच्यात भीती निर्माण केली जात आहे. सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर नागरिकांना त्याविरोधात आवाज उठविण्याचा अधिकार भारतीय संविधान ने दिला आहे. आम्ही लढू आणि जिंकू. असेही डॉ. राऊत यावेळी म्हणालेत.