महाविकास आघाडीची छ.संभाजीनगर येथे झालेल्या सभेमध्ये केवळ आक्रोश होता, ही शिल्लक सेनेची बोंबाबोंब सभा होती. भाषणातून सर्व वक्त्यांनी खोटारडेपणाचा कळस गाठला, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. श्री बावनकुळे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, सभेच्या मंचावर बसलेले सर्व नेते हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. अडीच वर्षे सत्तेत असताना मराठवाड्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काहीच केले नाही. ४० हजार कोटीच्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेत खोळंबा घातला. मराठवाडा वैधानिक मंडळाचे पुनर्गठन केले नाही. त्यावेळी अजित पवार काय म्हणाले होते ते महाराष्ट्राला माहिती आहे. मराठवाड्यातील जनतेशी बेईमानी करण्याचे काम मविआ सरकारने केले.
छ.संभाजीनगर नामकरणाच्या विषयाबाबत श्री बावनकुळे म्हणाले, ” हे नामकरण करण्याचा अधिकार केंद्र सरकारला होता. याबाबतचा प्रस्ताव मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविला, तो मोदीजींच्या सरकारने मान्य केला. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणतेही काम केले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहूल गांधी यांना चपलाने मारणार का? असा प्रश्नही श्री बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी विचारला.
उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक सभा सोडून जात होते. तरी देखील महाविकास आघाडीतील नेत्यांना ठाकरे यांना सहानभूती आहे हे दाखविण्यासाठी त्यांना मोठी खुर्ची देण्यात आली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जागा घेण्यासाठी उद्धव यांना १०० जन्म घ्यावे लागतील, असाही टोला श्री बावनकुळे यांनी लगावला.
• विश्वासघात सहन करणार नाही
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेचा व त्यांच्या पक्षातील नेत्यांचा विश्वासघात केला, त्यामुळे ते लोक सोडून गेले. जनता देखील हा विश्वासघात सहन करणार नाही.
• सरकारचे काम चांगले
शिंदे-फडणवीस सरकार चांगले काम करीत असून भ्रष्टाचाराला कुठेही थारा नाही. खोटे आरोप केले तर जशास तसे उत्तर दिले जाईल.
• येत्या काळात अनेक पक्षप्रवेश
अशोक चव्हाण भाजपात येणार का? या प्रश्नाच्या उत्तरात श्री बावनकुळे म्हणाले, येत्या काळात मोठे पक्ष प्रवेश होणार आहेत, हे सर्व महाराष्ट्राला दिसेल. पुण्यातील ठाकरे गटाचे मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. दंगली घडविणे हा आमचा स्वभाव नाही त्याची गरजही आम्हाला नाही, ही केवळ बोंबाबोंब आहे, असेही ते म्हणाले.