नागपूर : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांची निवड केली, त्यामुळे महाराष्ट्र भाजपमधील अनेक नेत्यांची धाकधूक वाढली आहे. भाजपने बहुमत जिंकलेल्या तिन्ही राज्यांमध्ये प्रस्थापित चेहऱ्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिली .
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या विधिमंडळाच्या आवारात हा एकमेव चर्चेचा मुद्दा होता. केवळ राज्यातील भाजपच्या वर्तुळातच नव्हे तर त्यांच्या मित्रपक्षांमध्येही या विषयावर चर्चा रंगली आहे: पुढील वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महाराष्ट्रात काय होईल? भाजप महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहऱ्याला संधी देणार का? भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना डावलणार का? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची आशा बाळगून-
राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सर्व खेळीचे सूत्रधार भाजप नेते देवेंद्र फडणवीस असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र शपथ सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. फडणवीस समर्थकांनी यावर नाराजीही व्यक्त केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची आशा बाळगून आहेत. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये नवे चेहरे दिल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत.
विनोद तावडेंसह अन्य नावांची चर्चा –
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पक्षश्रेष्ठींच्या जवळचे नेते मानले जात आहे. यातच आता तावडे यांनी एक विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.महाराष्ट्रात भाजप सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल, असे त्यांनी म्हटले. हे पाहता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना डावलून विनोद तावडे यांना संधी मिळू शकते अशी चर्चा रंगली आहे. या सोबतच अनेक नेत्यांची नावेही चर्चेत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अनेक नेत्यांचा पत्ता कट होणार –
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये नवे चेहरे दिल्याने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भाजप हायकमांडनं महाराष्ट्रातही नव्या चेहऱ्याला संधी दिल्यास आपले काय होणार या भीतीने काही नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. राज्यातील भाजपचे अनेक नेते व मंत्र्यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर असे काही घडले तयार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महायुतीच्या नेत्यांची मनधरणी करणे कठीण –
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. मंत्रिपदावरून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत सर्वांनाच संधी मिळणे कठीण असून प्रत्येक नेत्यांची मनधरणी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे काही विद्यमान खासदारांना डावलून राज्यातील काही ज्येष्ठ आमदारांना खासदारकीच्या मैदानात उतरविले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजप अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांचा विरोध –
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सत्तासमीकरणं बदलली जाणार आहे. या निवडणुकीनंतर जर महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली तर पक्षाकडून मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांना एकमताने पसंती मिळणे कठीण आहे. कारण भाजप अंतर्गत अनेक नेत्यांची फडणवीस यांच्यावर नाराजी आहे. यात पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.