नागपूर: शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालकीहक्काबाबत सातबारा हे महत्वाचे दस्ताऐवज असून खरीप कर्जापासून सर्वच योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होवू नये. डिजीटल ऑनलाईन सातबारा उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र दिनापासून घेतला आहे. शेतकऱ्यांना पीकाच्या नोंदीसह अनुषंगीक सर्व नोंदी अचूकपणे घेवून डिजीटल सातबारा उपलब्ध करुन द्यावा. यासाठी नागपूर जिल्हा आदर्श ठरावा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात शेतकऱ्यांना डिजीटल स्वाक्षरीयुक्त सातबाराचे वितरण शेतकऱ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. महाराष्ट्र दिनापासून राज्यात सर्व शेतकऱ्यांना देण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यस्तरावर मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. नागपूर विभागीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी आदी उपस्थित होते. यावेळी डिजीटल इंडियाअंतर्गत उत्कृष्ठ काम केलेल्या तलाठ्यांचा सत्कार करण्यात आला.
डिजीटल इंडियाअंतर्गत राज्यातील सर्व भूमीअभिलेखांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले असून सातबारा डिजीटल व ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सातबारा हा अचूक असावा, त्यावरील नोंदीमध्ये जागेची तसेच शेतातील पिकांची अचूक नोंद असणे गरजेचे आहे. त्यानुसार विविध योजनांचा लाभ देणे सूलभ होणार आहे. जिल्हयातील भूधारकांच्या नोंदीमध्ये शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 48 हजार नोंदीमध्ये बदल होत आहे. त्यानुसार नोंदी घेण्याची सूचना यावेळी दिली.
महसूल विभागातील सर्व नोंदी डिजीटल प्रध्दतीने होत असल्यामुळे तहसिल कार्यालयातही अत्यंत सुसज्ज यंत्रणा असलेला कक्ष तयार करुन येथे व्हिडीओ कॉन्सफरिंगची सुविधा निर्माण करावी. शेतकरी सातबारा अभावी योजनांपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, भूमी अभिलेखाचे संगणकीकृत करणे हा शासनाचा महत्तवकांक्षी आणि लोकाभिमूख उपक्रम आहे. संगणकीकृत सातबारामुळे शेतकऱ्यांना सुविधा होणार आहे. भूमीअभिलेखामध्ये एकसुत्रीकरणासाठी प्रणाली विकसित करण्यात आली असून ई-फेरफारला प्राधान्य देण्यात आले आहे. संगणकीकरणामध्ये नागपूर विभाग व नागपूर जिल्हा अग्रेसर असून यासाठी नायब तहसिलदार व तलाठी संवर्गाने यासाठी खुप परीश्रम घेतले यामुळेच डिजीटल व ऑनलाईन सातबारा तपासणी करण्यापर्यंत टप्पा गाठायचा असल्याचे अनूप कुमार यांनी सांगितले.
नागपूर विभागातील 7 हजार 361 गावात संगणकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून 31 मे पर्यंत विभागात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन डिजीटल सातबारा उपलब्ध करुन देण्यात येईल. यापुढे हस्तलिखीत सातबारा मिळणार नाही. कोणत्याही कामासाठी सातबारा न मागता ऑनलाईन सातबारा बघून कर्जासह शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे आवाहन अनूप कुमार यांनी केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात शेतकऱ्यांसाठी सातबारा खुप महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. एनएलआरएमपी अंतर्गत हे काम पूर्ण झाले असून आपली चावडी या संकेतस्थळावर जमिनीचा फेरफार व नोंदीची स्थिती कळणार आहे. विशेषत: ग्रामीण भागात महत्त्वाचा असलेला सातबारा नागरिकांना बिनासहाय्यस मिळावा यासाठी 6 लाख 50 हजार 174 सर्वे क्रमांकानुसार डिजीटल स्वाक्षरीकृत सातबारा तयार करण्याचे काम सुरु आहे. जिल्हयात 8 हजार 264 तर विभागात 60 हजार 206 डिजीटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपलब्ध झाला आहे.
पहिला डिजीटल सातबारा
शेतकऱ्यांना शेतीच्या मालकीहक्काबाबत महत्त्वाचे दस्ताऐवज असलेला पहिला डिजीटल सातबारा श्रीमती ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा तयार करण्यात आला असून विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. डिजीटल सातबारा वितरणाचा शुभारंभ बचतभवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रत्येक तालुकास्तरावरील पाच शेतकऱ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते डिजीटल सातबाराचे वितरण करण्यात आले.
नागपूर जिल्हयात 1956 गावांचा समावेश असून 7 लक्ष 61 हजार सातबाराची संख्या आहे. त्यापैकी डिक्लेरेशन 3 चे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात आले तर 8 अ ची संख्या 6 लक्ष 85 हजार आहे. जिल्हयात उत्कृष्ठ काम करणाऱ्या तलाठ्यांना तसेच डाटाबेस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डिजिटलाझेशनचे काम उत्कृष्ठपणे पूर्ण केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खंजाजी, जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी धनजय केसकर, तलाठी अजय खोब्रागडे, तसेच शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात सातबारा वितरीत करण्यात आला. आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी मानले.