Published On : Mon, Aug 29th, 2022
By Nagpur Today Nagpur News

नागपूर विद्यापीठातील तक्रारींच्या चौकशीसाठी सचिवस्तरीय अधिकारी नियुक्त करणार – चंद्रकांत पाटील

Advertisement

परीक्षा निकाल दिरंगाईचा आढावा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा कामांचे कंत्राट एमकेसीएल कंपनीला देण्यासह परीक्षांच्या निकालाला झालेला विलंब आणि विद्यापीठाशी संबंधित इतर तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी सचिवस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात येईल. एमकेसीएल कंपनीला दिलेले काम तातडीने थांबवावे. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सध्या परीक्षा विषयक कामकाज पाहणाऱ्या क्रोमार्क कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ देवून तिच्यामार्फत आगामी परीक्षा घेण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा निकालाला झालेल्या दिरंगाईचा आढावा घेण्यासाठी श्री. पाटील यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे आज बैठक घेण्यात आली. आमदार नागो गाणार, आमदार प्रवीण दटके, आमदार ॲड. अभिजित वंजारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र. कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ.राजू हिवसे, परीक्षा नियंत्रण बोर्डाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे आदी यावेळी उपस्थित होते.

एमकेसीएलला चुकीच्या पद्धतीने परीक्षाविषयक कामांचे कंत्राट दिल्याचे, तसेच प्रथम वर्षाच्या परीक्षांच्या निकालाला विलंब झाल्याचा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित झाला होता. या कंपनीची निवड आणि तिच्या कामकाजाबद्दलच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यात येईल. विद्यापीठाने यापुढे परीक्षाविषयक कामकाजासाठी केंद्र सरकारने विकसित केलेल्या ‘समर्थ’ प्रणालीचा वापर करण्याला प्राधान्य देवून त्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने करावी, असे श्री. पाटील यावेळी म्हणाले.

परीक्षांच्या निकालाला विलंब झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, तसेच त्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे आ. गाणार यावेळी म्हणाले. एमकेसीएल कंपनीची निवड नियमबाह्य पद्धतीने झाली असून यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. दटके यांनी यावेळी केली. आ. वंजारी यांनीही यावेळी परीक्षा निकालातील दिरंगाईसह इतर समस्या मांडल्या.

केंद्र सरकारने विकसित केलेल्या ‘समर्थ’ प्रणालीचा वापर करण्यासाठी विद्यापीठाने पाऊले उचलली असून त्यादृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांची माहिती प्रणालीमध्ये अपलोड करण्याची कार्यवाही लवकरच हाती घेणार असल्याचे कुलगुरू डॉ. चौधरी यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement