मुंबई : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोरेगाव, बोरीवली, मालाड, अंधेरी, विलेपार्ले, बांद्रा, चेंबूर आणि कुर्ला या भागात बनावट नकाशांच्या आधारे सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि एनडीझेड (नॅचरल डिफेन्स झोन) क्षेत्रांमध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
तसेच, बनावट नकाशे तयार केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.यापार्श्वभूमीवर भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे यांनी माहिती दिली.
पालिकेच्या उपआयुक्त परिमंडळ कार्यालय ७, ५, ४ आणि ३ मध्ये बनावट नकाशे तयार करून बांधकामे करण्यात आली होती. हा प्रकार गंभीर असून, या प्रकरणी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांसह सात खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येत आहे.
२० ते २२ मिळकतधारकांना दिवाणी न्यायालयातून कारवाईस स्थगिती मिळवली आहे. मात्र, उर्वरित बांधकाम मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते पाडण्यात येणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.