‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा
नागपूर : नेहमी प्रशासनच प्रत्येक गोष्ट करेल आणि त्याची वाट पाहत बघण्यापेक्षा किंवा वारंवार प्रशासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा नागरिकांनी स्वत:ही आपली नैतिक जबाबदारी ओळखून वागणे गरजेचे आहे. कोव्हिड संदर्भात वारंवार आवाहन करूनही शहरातील दुकाने, बाजारपेठांमध्ये हवी तशी काळजी घेतली जात नाही. यासंदर्भात आपल्याच आपल्या जुन्या सवयी बदलून सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालन करण्याची गरज आहे. मात्र वारंवार आवाहन करूनही या नियमांचे पालन होत नाही. ही शेवटची संधी असून प्रत्येकाने नियमांचे काटेकोर पालन न केल्यास नाईलाजास्तव नागपूर शहरात कडक लॉकडाउन आणि ‘कर्फ्यू’ लागू करावा लागेल, असा सज्जड इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
नागपूर शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन की संचारबंदी’ या विषयावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून गुरूवारी (ता.२३) नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
आयुक्त म्हणाले, कोव्हिडपासून बचाव करायचा असेल तर समोरची प्रत्येक व्यक्ती ही कोव्हिड पॉझिटिव्ह आहे असे मानून चालण्याची गरज आहे आणि त्यादृष्टीनेच सुरक्षेची काळजी घ्यायची आहे. सवयी बदलून स्वच्छतेची, शारिरीक अंतर राखले जाईल, मास्क वापरले जाईल, वेळोवेळी सॅनिटायजिंग केले जाईल याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा अंत करण्यासाठी या गोष्टींची सवय करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. शहरातील नागरिकांसह डॉक्टर, दुकानदार व अन्य आस्थापनाधारकांनी शासनाच्या दिशानिर्देशाचे काटेकोर पालन केल्यास कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडित करणे शक्य आहे, असेही आयुक्त यावेळी म्हणाले.
-तर लॉकडाऊनची वेळच येणार नाही
नागपूर शहरात लॉकडाऊन किंवा कर्फ्यू लागू करणे हा प्रशासनाचा उद्देश नाही. केवळ नागरिकांना स्वत:ची काळजी स्वत:च घेण्याची सवय लावणे हा हेतू आहे. हे जर आपण केल्यास आपण व्हायरसलाच लॉकडाउन करू शकू. मात्र आपण नेहमी प्रशासनाकडेच बोट दाखवतो. प्रशासन हे आपल्याच मदतीसाठी आहे. मात्र आपल्या प्रत्येकाचीही स्वत:च्या सवयी बदलून घ्यायची तयारी असायला हवी. आज देशातील इतर शहरांमध्ये कोव्हिडची जी स्थिती आहे ती आपल्या शहरातही असू शकते. हे टाळण्यासाठी आपल्या जुन्या सवयी बदलून शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करण्याच्या सवयी अंगीकरण्याची गरज आहे. या सवयी बदलून त्या अंगिकारल्यास आपल्या शहरात कधी लॉकडाऊनची वेळच येणार नाही, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.
सार्वजनिक उत्सव टाळा
ऑगस्ट महिना हा उत्सवांचा महिना आहे यासंदर्भात प्रशासनाद्वारे काय उपाययोजना करण्यात येत आहेत, या प्रश्नावर बोलताना आयुक्त म्हणाले, येणा-या ऑगस्ट महिन्यात बकरी ईद, रक्षाबंधन, गणेशोत्सव असे मोठे उत्सव आहेत. मात्र या संकटाच्या काळात कोणतेही उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. जिथे गर्दी होऊ शकते असे उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करणे अत्यंत धोकादायक आहे. प्रत्येक उत्सव यंदा आपण सर्व वैयक्तिकरित्याच साजरे करूया. मुंबई शहरामध्ये मंडळांनी स्वत: पुढे येऊन दहिहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. हाच पायंडा आपल्या नागपूर शहरातही पाळला जावा. यासाठी शहरातील गणेशोत्सव मंडळांनीही असाचा निर्णय घेऊन गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचा संकल्प करावा. सार्वजनिकरित्या विघ्नहर्त्याची आराधना करून विघ्न ओढवून घेण्यापेक्षा वैयक्तिकरित्याच उत्सव साजरा करून विघ्नमुक्तीची आराधना करूया, असे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.