नागपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि पराक्रमी योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ कामठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. राज्याचे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या नव्याने उभारलेल्या आणि सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या स्मारकाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात माजी आमदार टेकचंद सावरकर, अनिल निधान, अरविंदजी कुकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सह संपर्क प्रमुख दत्ताजी शिर्के, युवा चेतना मंचाचे राष्ट्रीय सचिव तसेच अनेक मान्यवर पाहुणे आणि मोठ्या संख्येने उपस्थित शिवभक्तांनी सहभाग घेतला. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन श्री शिव नित्य पूजन समिती आणि श्रीमंत योगी स्मारक समिती युवा चेतना मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
समारंभाचा मुख्य आकर्षण ठरला २५१ महिलांनी केलेला भव्य महाआरती सोहळला. ढोल-ताशांच्या निनादात आणि भव्य आतषबाजीच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. हे स्मारक केवळ त्यांच्या शौर्यगाथेला समर्पित नसून, या भागातील त्यांच्या अमर स्मृतीचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनले आहे. या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थिती लावली.