नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त देशभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व प्रधानमंत्री यांच्या उपस्थितीतील राष्ट्रीय समितीच्या बैठकीस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक सभागृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गठित राष्ट्रीय समितीची पहिली बैठक झाली. 2019 मध्ये महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी होत आहे. याचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने “बापू को कार्यांजली” हा कार्यक्रम आखला आहे. यासाठी राष्ट्रीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह, माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यासह विद्यमान विविध केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांचा सहभाग असलेले एकूण १२४ अन्य गणमान्य मान्यवरांचा समावेश आहे. आजच्या बैठकीस यातील ८० सदस्य उपस्थित होते.
महात्मा गांधींचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविणे प्रमुख उद्देश : मुख्यमंत्री
महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, ग्रामविकास व शेतीवर आधारित भारत देशाची संकल्पना मांडली होती. याच विचारावर आधारित कार्यक्रमांची आखणी करून केंद्र व देशातील विविध राज्य सरकार यांच्या समन्वयाने विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.