गोंदिया: समाजातील वाईट प्रथांवर वार करण्याचे आणि प्रत्येक वाईट गोष्टीविरोधात उभे करण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे. संत साहित्याने समतेचा संस्कार करुन समाजाचे आत्मबल जागे करण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आज अर्जुनी/मोरगाव येथील संत चोखोबा नगरीत वारकरी साहित्य परिषद, आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने आयोजित ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात विशेष अतिथी म्हणून श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ह.भ.प. डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर, स्वागताध्यक्ष पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार सर्वश्री डॉ.परिणय फुके, आमदार संजय पुराम, विजय रहांगडाले, समाजकल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त मिलींद शंभरकर, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, माजी आमदार हेमंत पटले, सप्त खंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज, बाबा महाराज राशनकर, माधव महाराज शिवनीकर, प्रशांत महाराज ठाकरे, महादेवबुवा शहाबाजकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, संत हे कर्माने व ज्ञानाने मोठे झाले. त्यामुळे समाजातील सर्व लोक या संतांपुढे नतमस्तक होतात. ११ ते १७ व्या शतकापर्यंत आपल्या संस्कृतीवर आक्रमण होत होते, हे आक्रमण परतवून लावण्याचे काम वारकरी संतांनी केले. वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही. लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम संतांनी केले. संतांनी विश्वाची, जनतेची चिंता केली. ते कधीच आत्मकेंद्रित नव्हते. हे विश्व माझे घर आहे हा विचार वारकरी संप्रदायाने मांडला. वारकरी संप्रदाय हे जगातील अद्वितीय संघटन असल्याचे सांगून श्री.फडणवीस पुढे म्हणाले, अत्यंत शिस्तीत ते पंढरीच्या वारीला जातात. आपली संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत आहे. संतांचे साहित्य समाजापर्यंत पोहोचले तर समाजातील व्याधी दूर होतील. तुकोबा, ज्ञानोबा यांच्या लिखाणातून मिळणाऱ्या ज्ञानामुळे मन:शांती लाभेल. आज शेतकऱ्यांवर अरिष्ट आले आहे. वातावरणातील बदलामुळे हे होत आहे. वनांचे, जंगलांचे, तलावांचे नुकसान आपण केले तर निसर्ग आपल्यावर कोपतो. मानवाने निसर्गाची काळजी घेतली नाही, त्यामुळेच ही नैसर्गिक संकटे ओढावतात असे त्यांनी सांगितले.
यावर्षी जिल्ह्यात दुष्काळाच्या स्थितीमुळे रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना धानाची रोवणी करता आली नाही असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, शेती शाश्वत करताना निसर्गाचा समतोल राखून करावी. त्यामुळे अडचण येणार नाही. जिल्ह्यातील ४२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा करण्यात आला आहे. इथला शेतकरी संकटाचा सामना करतो, आत्महत्या करीत नाही. या जिल्ह्यातील रोहयोच्या कामावरील १ लाख मजुरांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मदत म्हणून प्रत्येकी एक रुपया दिला आहे. जिल्ह्यात राईस पार्कला मान्यता देण्यात येईल. त्यामुळे धान संशोधनास व शेतकऱ्यांना मदत होईल. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा धरुन शेतकऱ्याला हमीभाव देण्याचा निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना मदत करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता केंद्रातून गरजू व्यक्तींच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात येत आहे. त्यामुळे गरीब व गरजू व्यक्त्तींच्या शस्त्रक्रिया मोफत करता येणे शक्य होईल. केंद्रीय अर्थसंकल्पातील आरोग्य योजनेमुळे देशातील ५० कोटी लोकांना उपचार व शस्त्रक्रियेसाठी ५ लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे.
सत्यपाल महाराज यांच्या कार्याचा गौरव करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनामुळे हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्यास मदत झाली आहे. संत चोखोबांच्या मंगळवेढा या निर्वाणभूमीत त्यांचे चांगले स्मारक उभारण्यात येईल.
जिल्ह्यातील वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये करण्यास जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहे.
संमेलनाध्यक्ष डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र संस्कृतीचा खरा इतिहास विदर्भ भूमीत आहे. सदाचार व सद्वर्तनाचे काम संत साहित्याने केले आहे. सर्व तत्वज्ञानाला एकत्र करुन समग्र राष्ट्राचा अभ्युदय व्हावा यासाठी संतांचे योगदान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात सदाचाराला महत्त्व आहे. धर्म व संस्कृतीला मानणारे शासन राज्याला लाभले आहे. आज संत विचारांची गरज आहे. संतपीठ तसेच संत साहित्याचे प्रत्येक विद्यापीठात अध्ययन केंद्र सुरु झाले पाहिजे. संत साहित्याचा मूल्यशिक्षणामध्ये समावेश केला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना पालकमंत्री श्री. बडोले म्हणाले, संतांनी व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा पुरस्कार केला व तो समाजात रुजविला. संतांचा समतेचा व बंधुत्वाचा संदेश गावोगावी पोहोचविला. व्यसनमुक्त समाज आणि समतेचा संदेश घेऊन सत्यपाल महाराज काम करीत आहेत. संत चोखोबांच्या नावाने हा पुरस्कार राज्यात पहिल्यांदाच देण्यात येत आहे. सामाजिक बंधुत्वाची भावना रुजविण्यासाठी हे संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने जनतेच्या कल्याणासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. धानाला प्रति क्विंटल २०० रुपये बोनस जाहीर केल्याबद्दल तसेच नवेगावबांध, प्रतापगड व चुलबंद येथील पर्यटनस्थळाच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये निधी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
यावेळी सत्यपाल महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरु केलेला पहिला संत चोखामेळा पुरस्कार सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार म्हणून ५१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्यपाल महाराजांना देण्यात आले. यावेळी बाबा महाराज राशनकर, माधव महाराज शिवणीकर, प्रशांत महाराज ठाकरे व महादेवबुवा शहाबाजकर यांना वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसाराचे विशेष कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे मंचावर आगमन होताच वारकरी फेटा, घोंगडी व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार बार्टीचे महासंचालक कैलाश कणसे यांनी मानले.