मुंबई : आमदार राम कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गरिबों का डॉक्टर गाडीचे उद्घाटन विधानभवन परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फित कापून झाले. या चालत्या-फिरत्या दवाखान्यातून गरिबांची सेवा व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर, आमदार राम कदम, आमदार आशिष शेलार उपस्थित होते.
या गाडीच्या माध्यमातून फूटपाथवर राहणाऱ्या, भीक मागून जगणाऱ्या अशा रस्त्यावरील गरीब रुग्णांची सेवा करण्यात येणार आहे. पैशाअभावी होऊ न शकणाऱ्या शस्त्रक्रिया, तपास व औषधे या सेवा गाडीच्या माध्यमातून उपलब्ध असणार आहेत. या गाडीमध्ये अॅम्ब्युलन्सप्रमाणे तज्ज्ञ डॉक्टर, अधिपरिचारिका, तपासाच्या सुविधा असणार आहेत. हा चालता-फिरता दवाखाना संपूर्ण मुंबई परिसरात फिरणार आहे.
गाडीच्या माध्यमातून दोन लाख रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांना दिली.