सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरु करण्याच्या मागणीला राज्य शासन निश्चित परवानगी देईल आणि त्यासाठीचा निधीही उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक आराखड्याला टप्प्याटप्याने आवश्यक निधीही दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र, प्रत्येक विद्यापीठाने विस्तारीकरणाबरोबरच गुणवत्ता विकासाकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विद्यापीठाच्या भव्य व सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन करताना आपल्याला आनंद होत आहे. कारण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित असले तरी या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव दिले आहे. त्यांचे कार्य देशभरात आणि विविध क्षेत्रात होते. कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे विद्यापीठाने अध्यासन सुरु करावे, त्यास आवश्यक तो निधी निश्चितपणे देऊ.
विद्यापीठाने विस्तारीकरणासाठी आखलेल्या आराखड्यास टप्प्याटप्प्याने निश्चितपणे अर्थसंकल्पातून निधी दिला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सध्या सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत आहेत. हे क्षेत्र विस्तारत असताना त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ विद्यापीठाने तयार केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची कल्पना मांडली आहे. येत्या पाच वर्षात त्या दिशेने काम होऊन अधिकाधिक गुंतवणूक देशात होईल, असा विश्वास आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम आता सुरु आहे. विद्यापीठांनी हा बदल ओळखून त्यासाठीचे आवश्यक अभ्यासक्रम समाविष्ट केले पाहिजेत.
मूलभूत संशोधन क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या देशातील ज्ञान कधी सुविधांमध्ये अडकले नाही. नालंदा व तक्षशिलासारखी विद्यापीठे त्याकाळी आपल्या देशात होती. शल्यचिकित्सा, खगोलशास्त्र अशा विषयांचा अभ्यास त्याकाळी केला गेल्याचे दिसते. विद्यापीठांनी आता डॉक्टरेट मिळवणाऱ्या संशोधन प्रकल्पांचा खरोखरच किती फायदा विद्यार्थ्यांना होतो, हे तपासले पाहिजे असे त्यांनी नमूद केले. त्यामुळेच आता विद्यापीठाची जबाबदारी वाढली असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी प्रास्ताविकात, विद्यापीठामार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठाने 14 वर्षे पूर्ण करुन 15 व्या वर्षात पदार्पण केले आहे. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्यापीठात येणारे श्री. फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तसेच दीपप्रज्वलन केले. तत्पूर्वी विद्यापीठाच्या विस्तीर्ण ४८२ एकर परिसरात नवीन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे आभार कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले.