मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा दया…
निवडणूक प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्हे लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी गमावला आहे. सुप्रीम कोर्टात त्यांची निवडणूक रद्द होईल तेव्हा होईल परंतु त्यांनी मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा दयावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हयाची माहिती लपवल्याप्रकरणी नोटीस बजावली असून मुख्यमंत्र्यांच्या या पारदर्शक कारभारावर नवाब मलिक यांनी जोरदार टिका केली आहे.
निवडणूक लढत असताना उमेदवाराने शैक्षणिक योग्यता, संपत्तीची माहिती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणे बंधनकारक असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन फौजदारी गुन्हयाची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवली असून त्याबाबत सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी नैतिकतेच्या गप्पा मारतात…पारदर्शक कारभार असला पाहिजे असं सांगत आहेत आणि दुसरीकडे स्वत:वरील दोन गुन्हे लपवणं हा किती पारदर्शक कारभार आहे हे याच्यातून सिध्द झाले आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.