मुंबई: महाआरोग्य शिबिरातून निदान झालेल्या गरजूंवरील शस्त्रक्रिया तसेच अन्य आवश्यक उपचारांसाठी रुग्णकेंद्रित सुविधा पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच महाआरोग्य शिबीर यांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे या प्रसंगी उपस्थित होते.
राज्यात औरंगाबादसह,नागपूर, अहमदनगर, नांदेड आणि जळगाव जिल्ह्यात महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातून निदान झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रियांची गरज निर्माण झाली आहे. पण या योजनेत संबंधित जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये रुग्णालये समाविष्ट नसल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. त्याअनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यातील समाविष्ट नसलेली रूग्णालयेही म. फुले जनआरोग्य योजनेची जोडण्यात येणार असल्याचा निर्णय झाला.
बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. शासकीय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच आवश्यक तेथे खासगी रुग्णालयांचा समन्वय साधण्यात यावा. दुर्गम आणि ज्या ठिकाणी या योजनेशी संलग्न रुग्णालये नसतील त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात याव्यात. शस्त्रक्रिया वेळेत व्हाव्यात सर्वच यंत्रणांनी प्रयत्न करावेत. खासगी रुग्णालये आणि तज्ज्ञ शल्य विशारदांची सेवा मिळविण्यासाठी दोन महिन्यांच्या कालावधी करिता उपाय योजना कराव्यात. यासाठी विमा कंपनीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले.
धर्मादाय रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संबंधित रुग्णालयात ठळकपणे फलक लावण्याच्या तसेच याबाबत टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सुरु असलेल्या ऑनलाईन प्रणालीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.