नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेनंतर आता लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात केलेल्या भाषणादरम्यान ही घोषणा केल्याने तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत प्रशिक्षणादरम्यान युवकांना दरमहा 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे.
या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल. या योजनेतंर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, आयटीआयला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहे.महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून हा अर्ज भरला जाईल.