कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्या अटकेची मागणी सर्व स्तरावरून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाब विचारण्याचा इशारा कोल्हापुरातील ‘इंडिया’ आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सकाळपासूनच कोल्हापूर पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. शिवसेनेचे (उबाठा) शहर संघटक हर्षल सुर्वे, तसंच काँग्रेस कार्यकर्ते आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी सकाळी त्यांच्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली. याच्या निषेधार्थ कोल्हापूरसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. कोरटकर विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर झाला. असे असले तरी कोरटकर अद्याप फरार असल्याने या सर्व विरोधात ‘इंडिया’ आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी कोरटकरवर कारवाई करावी आणि मगच कोल्हापुरात यावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची होती. अन्यथा या दौऱ्यादरम्यान गनिमी काव्याने त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा ‘इंडिया’ आघाडीनं दिला होता.