गडचिरोली: गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात बांधण्यात आलेल्या 100 खाटांच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.
आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत, पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, जि प अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ देवराव होळी, क्रिष्णा गजबे,, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त अनुपकुमार जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, उपसंचालक डॉ संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद खंडाते, डॉ सयाम यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री यांनी रुग्णालयातील सेन्ट्रल क्लिनिकल लेबॉरेटरीसह विविध वॉर्डची पाहणी केली. महिला रुग्णालयातील सॅनिटरी नॅपकिन वितरण मशीन व इनसिनरेटर मशीनचे लोकार्पण मुख्यमंत्री यांचे हस्ते करण्यात आले.
सेन्ट्रल क्लिनिकल लेबॉरेटरी असणारे हे राज्यातील पहिलेच रुग्णालय आहे. येथे स्त्रियांच्या गर्भाशय कर्करोगाचे निदान करता येईल असे काल्पोस्कोपी हे यंत्र बसविण्यात आले आहे. या सोबत सिव्हेज ट्रीटमेन्ट प्लांट, सोलर वॉटर हीटर आणि रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा यात असल्याने एक प्रकारे हे पर्यावरण अनुकूल असे ग्रीन हॉस्पीटल ठरलेले आहे.
विदर्भ विकास कार्यक्रम 2009 अंतर्गत हे रुग्णालय मंजूर झाले होते. याचे भूमिपूजन 5 डिसेंबर 2010 रोजी तत्कालिन पालकमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते झाले होते. इमारतीचे एकूण बांधकाम 8,471.98 चौरस मीटर असून यासाठी 18 कोटी 77 लक्ष 9 हजार रुपये खर्च आला आहे.
या रुग्णालयासाठी 66 पदे मंजूर झालेली आहेत. यात एक अधीक्षकाचे पद असून एक स्त्री रोग व प्रसूती तज्ञ आहे. 2 बधिरीकरण तज्ञ, 2 बालरोग तज्ञ व एक क्ष -किरण तज्ञ आहे. इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या 8 आहे. 66 पैकी 57 पदे कार्यरत आहेत. वर्ग 3 ची 5 आणि वर्ग 4 ची 24 पदे बाहय यंत्रणेमार्फत भरण्यात येत आहेत.