बीड : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांचा आरक्षित जागेवर बांधण्यात आलेला बंगला तातडीने जमीनदोस्त करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
सोलापूर येथे सहकारमंत्री देशमुख यांचा बंगला अग्निशमन दलाच्या जमिनीवर आहे. अशी माहिती महापालिका आयुक्तांच्या अहवालातून समोर आली आहे.आता हे प्रकरण न्यायालयात गेले असून, याबाबात २६ पानाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. अहवालात सुभाष देशमुख यांच्या बंगल्याच्या बांधकामावर अनेक आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली. देशमुख यांचा बंगाल जमीनदोस्त करावा, तसेच या मंत्र्यांनी एक मिनिटही पदावर राहू नये, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
ज्याप्रमाणे एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करण्यात आली,त्याचप्रमाणे कारवाई यांच्यावर करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. हे प्रकरण न्यालायात गेल्यामुळेच हा घोटाळा उघड झाला असून याविषयी सभागृहात आवाज उठविणार असल्याचा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला.