नागपूर: अकोला जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण अधिक आहे, या भागातील जमिनीच्या सुधारासाठी शेततळे वरदान ठरणार आहेत, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि जलयुक्त शिवार योजनेतून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत, मात्र या दोन्ही योजनांचे एकत्रिकीकरण करुन भूसुधाराचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले.
विधान भवनातील मंत्री परिषदेच्या सभागृहात आज अकोला जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, गृह राज्यमंत्री तथा अकोलाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, गोपीकिशन बाजोरिया, रणधीर सावरकर,हरिष पिंपळे, बळीराम सिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त पियुष सिंह,जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, शेततळी आणि धडक सिंचनाच्या विहिरी जलदगतीने पूर्ण करण्याची गरज आहे, धरणाच्या सिंचन क्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नसल्यास संबंधित गावांचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत करावा. आवश्यकतेनुसार जलसंधारणाची कामे योग्य योजनेतून पूर्ण करावीत, ही कामे करताना एकत्रित आराखडा तयार करुन पूर्ण करावीत. जलसंधारणाची कामे वेगाने होण्यासाठी भारतीय जैन संघटनेची मदत घेऊन ही कामे 2019 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी देणे महत्त्वाचे आहे, ही कामे कंत्राटदाराकडून वेळेत पूर्ण करुन घ्यावीत. कामे प्रलंबित ठेवणाऱ्या कंत्राटदारांकडून कामे काढून त्यांना काळ्या यादीत टाकावे. जिल्ह्यातील नेरधामणा प्रकल्पासह अपूर्ण प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यात यावीत. अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील 181 गावांसाठी असणारी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करावीत.मोर्णा नदीच्या विकासासाठी राज्याने मंजूर केलेला निधी टप्प्याटप्प्याने देण्यात येईल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
जुन्या गावठाणातील घरे शहराच्या हद्दीत आली आहेत, या घरांच्या आठ-अ नमुन्यानुसार आर्किटेक्टकडून विकास आराखडा तयार करुन घेऊन तो नगररचना विभागाकडून मंजूर करुन घ्यावा, तसेच अतिक्रमीत घरांच्याबाबतीत पक्क्या घरांना नियमित करुन उर्वरित घरांचे प्रमाणिकीकरण करुन झोपडपट्टी सुधार कायद्यानुसार उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश त्यांनी मनपा आयुक्तांना दिले.
अकोला शहराच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे, यात सांस्कृतिक भवनाच्या बांधकामासाठी निधी देण्यात येईल तसेच जुन्या बसस्थानकाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांतील स्वच्छतेसाठी तातडीने निधी देण्यात येईल,तसेच औषधाचा तुटवडा भासू दिला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.