मुंबई : पुणे जिल्ह्यातील गुंजवणी प्रकल्पासंदर्भात पाणीवाटपाचा प्रश्न, नदीतील बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, पुनर्वसनाचा प्रश्न आदीसंदर्भात संबंधित विभागांनी बैठक घेऊन हे प्रश्न तातडीने सोडवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
विधानभवन येथे आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार संग्राम थोपटे, पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांच्यासह गुंजवणी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आली आहे. प्रकल्पांमधील पाणी पाईपलाईनने शेतीपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन सिंचन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन सिंचनाचे नियोजन करण्यात यावे. गुंजवणी प्रकल्पाचा पुणे जिल्ह्यातील मोठ्या भागाला लाभ होणार आहे. या प्रकल्पासंदर्भात पाणीवाटपाचा प्रश्न तसेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, त्यांना जमिनीची उपलब्धता करुन देणे आदी संदर्भात बैठक घेऊन जलद गतीने निर्णय घेण्यात यावेत. तसेच गुंजवणी नदीतील बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.