लातूर : राज्यात कोरोनाच्या लॉकडाऊननंतर बालविवाहाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचा दावा रुपाली चाकणकर यांनी केला. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लातूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. कोरोना काळात मोबाई फोनचा अतिवापर झाला.
त्यामुळे अल्पवयीन मुले -मुलींचे अभ्यासावरुनही लक्ष उडाले. आई – वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद संपला आहे. यामुळेच मुली प्रेमात पडून घरातून पळून जाऊ लागल्या आहेत, असे चाकणकर म्हणाल्या.यादरम्यान महाराष्ट्रात बालविवाह वाढले.
लातूर जिल्ह्यात लॉकडाऊनदरम्यान ३७ बालविवाह रोखले गेले. एकंदरीतच महाराष्ट्रात बालविवाहांचे प्रमाण वाढले मात्र याची आकडेवारी चाकणकर यांनी जाहीर केली नाही. गावांमध्ये जेव्हा ग्रामसभा घेतल्या जातात तेव्हा बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजनांवर चर्चा झाली पाहिजे.पोलिसांच्या दामिनी स्क्वाडने मुलींना सुरक्षा पुरवण्यासह त्यांच्याशी चर्चाही केली पाहिजे.
महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत महिला आयोगाने महाराष्ट्रातल्या २८ जिल्ह्यांमधल्या जवळपास १८ हजार तक्रारींचा निपटारा केला आहे. सोमवारी आम्हाला लातूर जिल्ह्यात ९३ तक्रारी मिळाल्या त्यानंतर हे प्रकरण सोडवत असल्याचे चाकणकर म्हणाल्या.