मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिडको जमीन घोटाळ्याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राज्य सरकारला धारेवर धरले . मुख्यमंत्र्यांना फाजील ‘लाड’ भोवल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. खडसे यांना भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्र्यांनी घरी बसवले होते. कारण स्वच्छ पारदर्शक कारभाराचे ते भोक्ते आहेत. मग आता मुख्यमंत्र्यांना खडसे यांना मंत्रिमंडळात घ्यावे लागेल, नाहीतर मुख्यमंत्र्यांनाही ‘स्वच्छ’ होऊन जनतेसमोर यावे लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सिडकोच्या जमीन घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली. या चौकशीस आपण तयार असून, यातील बिल्डर मनिष भतिजा यांचे काँग्रेस सरकारमध्ये ‘चाचा’ कोण होते व त्या काळात याप्रकारे किती भूखंड दिले तेही जाहीर करू, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दरम्यान, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत या सरकारची भूमिका दुटप्पी असून शिवसेनेच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर चौकशी अधिकारी नियुक्त होतात. मात्र भाजपाच्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची लोकायुक्तांकडून चौकशी केली जाते, असे विखे-पाटील म्हणाले. सरकारची एक्स्पायरी डेट ठरली असून ती कदाचित २०१९ पूर्वीच येईल, असे भाकीतही त्यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीसांनी पावसाळी अधिवेशन त्यांच्या मर्जीने नागपुरात हलवले आहे. अशा हलवाहलवीने विदर्भाचे खरोखरच भले होणार असेल तर ‘तथास्तू’ म्हणायला आमची काहीच हरकत नाही. खरं तर हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असते. पण ‘थंडी’चा पत्ता नसतो व आता मुंबईत मुसळधार जलधारा बरसत असल्या तरी नागपूर कोरडेठाक आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन यशस्वी व्हावे म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग सरकार करणार आहे काय? अधिवेशने येतात आणि जातात. जनतेचे प्रश्न मंत्रालय आणि विधिमंडळाच्या पायरीवर वर्षानुवर्षे ताटकळत उभेच आहेत. मग एखादा धर्मा पाटील बंड करतो व मंत्रालयाच्या दारात आत्महत्या करतो. अशा हत्या आणि आत्महत्यांनी सरकारचे मन द्रवेल व शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटतील अशी सुतराम शक्यता आम्हास वाटत नाही. प्रश्नांचा डोंगर साचला आहे. मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी हा डोंगर कसा पोखरणार व राज्याला कसा दिलासा देणार, हा प्रश्नच आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेसने, खास करून पृथ्वीराज चव्हाण यांनी १७०० कोटींचा भूखंड घोटाळ्याचा जो गडगडाट केला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांसमोर नक्कीच विजा चमकल्या आहेत. हा आरोप पुराव्यासह झाला आहे व ‘स्फोट’ करणारे पृथ्वीराज चव्हाण आहेत हे लक्षात घेतले तर १७०० कोटींचा भूखंड घोटाळा साधा नाही व नागपूरच्या अधिवेशनात तो भाजपास स्वस्थता लाभू देणार नाही.
नवी मुंबई विमानतळाजवळ, मोक्याच्या ठिकाणची सिडकोची २४ एकर जमीन हा मुख्यमंत्री कार्यालयाच्या भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू आहे. त्या जमिनीची आजची किंमत १७०० कोटी आहे. ही जमीन आठ धरणग्रस्त शेतकरी कुटुंबांकडून दोन बिल्डर्स मनीष भतिजा व संजय भालेराव यांनी किरकोळीत १५ लाख रु. एकर भावाने दमदाटी करून, शेतकऱ्यांच्या कानशिलावर बंदूक लावून विकत घेतली (असा आरोप आहे). कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या या जमीन व्यवहारात एकेकाळचे अजित पवारांचे खासमखास व आता मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘खास’ प्रसाद लाड यांचे नाव समोर आले. ही जमीन विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी असताना बिल्डरांनी गिळली. कोयना प्रकल्पामध्ये विस्थापित झालेल्यांनाच ही शेतजमीन देण्याचा सरकारने नियम केला. परंतु ही मोक्याची जमीन बिल्डरांना सहज मिळाली. नियमाप्रमाणे हे शेतकरी १० वर्षे त्यांची जमीन विकू शकत नाहीत. मग हा १७०० कोटींचा व्यवहार होत असताना आणि शेतकऱ्यांना तसेच सरकारला फसवले जात असताना नगरविकास खात्याचे अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी, सिडकोचे एम.डी. गप्प का बसले? कोणाच्या दबावामुळे हा घोटाळा सुरळीत पार पडला?
गोरगरीबांच्या पोटापाण्याचे अनेक प्रश्न लटकलेले असताना सिडकोच्या भूखंडाची फाईल ज्या वेगाने सरकत गेली हे एक आश्चर्यच आहे. किमती ठरत नाहीत म्हणून म्हाडाच्या सात हजार घरांची लॉटरी अडकून पडली, पण भतिजा बिल्डरची १७०० कोटींची फाईल अडकली नाही. असे हे लोककल्याणकारी राज्य सुरू आहे. या लोककल्याणकारी राज्यात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. अफवांचा स्फोट झाला व मुले पळविणारी टोळी आहे असे समजून गोसावी समाजाच्या पाच निरपराध लोकांना धुळ्यातील साक्रीत जमावाने ठार केले. हे फक्त धुळ्यातच घडले नाही तर मालेगाव, गोंदिया येथेही घडले आहे.
राज्यकर्त्या पक्षाने खोटे बोलायला सुरुवात केली व लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवून मते दिली. त्याच खोटेपणाच्या पायावर राज्य उभे असेल तर धुळ्यासारख्या घटना घडणारच. काँग्रेसने आतापर्यंत असंख्य घोटाळे केले. घोटाळ्याचा प्रत्येक आरोप काँग्रेसने नाकारला. मुख्यमंत्र्यांनीही सिडको भूखंड घोटाळ्याचा आरोप नाकारला. हताश काँग्रेसचा हा पोरकटपणा असल्याचे त्यांनी सांगितले, पण फाजील ‘लाड’ मुख्यमंत्र्यांना भोवले हे कागदपत्रे सांगत आहेत. खडसे यांना एका भूखंड घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनी घरी बसवले. कारण स्वच्छ पारदर्शक कारभाराचे ते भोक्ते आहेत. आता खडसे यांना मंत्रिमंडळात घ्यावे लागेल, नाहीतर मुख्यमंत्र्यांना ‘स्वच्छ’ होऊन जनतेसमोर यावे लागेल.