नागपूर :दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे.
सकाळी 11 वाजता दहावीचा पहिला पेपर पार पडला असून परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसले आहेत.तर एकट्या नागपूर विभागातील ६८२ परीक्षा केंद्रांवर १ लाख ५१ हजार ३७९ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
यंदा दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी राहणार असून यासोबतच राज्यातील 701 केंद्रांतील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.या वर्षी प्रत्येक जिल्ह्यात ५ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
यामध्ये प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण, नियोजन आणि उपशिक्षण अधिकाऱ्यांचे भरारी पथके समाविष्ट असतील. याशिवाय, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाचे भरारी पथक देखील परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवतील.