नागपूर : एकीकडे राज्य सरकार कॉपीमुक्त अभियान राबवत असून, दुसरीकडे मात्र अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी आणि बारावीच्या पेपरला सुरुवात झाली आहे.
या अंतर्गत १७ आणि २२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या बारावी विज्ञान परीक्षेच्या भौतिकशास्त्राचा ७० टक्के आणि गणिताचा १०० टक्के प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली असून एका विद्यार्थाने याबाबत दावा केला आहे. यासंदर्भात निनावी मेलद्वारे शालेय शिक्षण विभागाच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. माहितीनुसार, काटोलमध्ये नागपूर विभागांतर्गत असलेल्या जवळजवळ सर्व केंद्राच्या परिसरात परीक्षेच्या नियोजित वेळेच्या १ तास अगोदर प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेच्या गोपनीयतेवर शंका निर्माण झाली आहे.
कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा –
कॉपीमुक्त अभियानात राज्याचा ‘नोडल अधिकारी’ म्हणून शिक्षण आयुक्त यांना व प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच ‘समन्वयक अधिकारी’ म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्यात. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात यावे, अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.