नागपूर: नागपूर रेल्वे स्थानकावरील सफाई कामगारांना अद्याप वेतन मिळाले नाही. आधी २२ नंतर २८ मार्च या तारखेला वेतन देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासन न पाळल्यामुळे आता अर्धपोट उपाशी राहून रेल्वे स्थानकाची स्वच्छता शक्य नाही. त्यामुळे त्यांच्यात खदखद आहे. कुठल्याही क्षणी कामबंद आंदोलन होऊ शकते.
सफाई कामगारांना मागील अडीच महिण्यांपासून वेतनच मिळाले नाही. जुन्या कंत्राटदाराने दिड महिण्याचे तर नव्या कंत्राटदाराने चालु महिण्याचे वेतन दिले नाही. त्यामुळे सफाई कर्मचारी अडचनीत आले आहेत. दरम्यान सफाई कामगारांना पुढील आठवड्यात त्यांचे रखडलेले वेतन देण्यात येईल, ही रक्कम संंबधीत कंत्राटदाराच्या अनामत रकमेमधून वसूल करण्यात येईल, असे आश्वासन कामगारांना दिले होते.
नागपूर रेल्वेस्थानकावर १५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत सफाईचे कंत्राट एस. के. वली नावाच्या कंत्राटदाराला देण्यात आले होते. परंतु या कंत्राटदाराने सफाई कर्मचाºयांचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे असे मिळुन दिड महिन्याचे वेतन न देताच पळ काढला. त्यानंतर सफाईचे कंत्राट कोटेशननुसार दुबे नावाच्या व्यक्तीला देण्यात आले. त्यानेही सफाई कर्मचाºयांच्या वेतनाची तारीख १० मार्च असताना अद्याप वेतन दिलेले नाही. यामुळे रेल्वेस्थानकावरील सफाई कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे.
उपाशीपोटी रेल्वेस्थानकाची सफाई त्यांना करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेची जबाबदारी कंत्राटदारांच्या हाती सोपविल्यापासून सातत्याने सफाई कर्मचाºयांना वेतन मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आता तर अडीच महिन्याचे वेतन रखडल्यामुळे जगण्याचा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या नेहमीच्या कटकटीतून कायमचा तोडगा काढून सफाई कर्मचाºयांना दिलासा देण्याची मागणी सफाई कर्मचारी करीत आहेत.